...अन्यथा मंगळवारपासून बेमुदत संप
By Admin | Updated: July 12, 2014 00:42 IST2014-07-12T00:36:47+5:302014-07-12T00:42:50+5:30
नगरपरिषद कर्मचारी : मागण्यांसाठी दिला इशारा

...अन्यथा मंगळवारपासून बेमुदत संप
कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावून प्रश्न मार्गी लावा, अन्यथा मंगळवार (दि. १५)पासून राज्यातील सर्व नगरपालिकांचे कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्यतर्फे आज, शुक्रवारी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्यतर्फे ८ जूनला इचलकरंजी येथे पुणे विभागीय मेळावा झाला. या संघटनेच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती स्थापन करून राज्यातील नगरपरिषदेमधील सर्व कर्मचाऱ्यांनी न्याय मागण्यांसाठी
१ व २ जुलैला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील
९ नगरपरिषदांमधील १५०० कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी २ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. यानंतरही या मोर्चाची दखल शासनाने घेतली नाही. म्हणून मंगळवार (दि. १५) पासून बेमुदत संपावर जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत याबाबत बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा इशारा दिल्याप्रमाणे कर्मचारी संपावर जाणार आहेत. राज्यातील २२७ नगरपरिषदांचे सुमारे ७५ हजार कर्मचारी संपावर गेल्यास कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
शिष्टमंडळात नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीचे हरी माळी, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, नौशाद जावळे, शिवाजी जगताप, रघुनाथ देशिंगे, विजय पाटील, राजू भुर्इंबर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)