कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा अन्य राज्यांनी पाहाव्यात : अनिल स्वरूप

By Admin | Updated: March 8, 2017 17:59 IST2017-03-08T17:58:44+5:302017-03-08T17:59:24+5:30

शाळांना दिल्या भेटी, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा समाधानकारक

Other states to see the schools in Kolhapur district: Anil Swaroop | कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा अन्य राज्यांनी पाहाव्यात : अनिल स्वरूप

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा अन्य राज्यांनी पाहाव्यात : अनिल स्वरूप

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा अन्य राज्यांनी पाहाव्यात

 प्राथमिक शिक्षणाचा दर्जा समाधानकारक
कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा समाधानकारक असून शाळांनी अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. इतर राज्यांतील शिक्षक, अधिकारी व मान्यवरांनी या शाळा पाहाव्यात, असे चांगले उपक्रम शाळा-शाळांमधून राबविले जात असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील काही शाळांना त्यांनी भेटी दिल्या आणि कामकाजाचे कौतुक केले.
ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेची पटसंख्या १४२ असून शाळेला ‘आयएसओ मानांकन’प्राप्त झाले आहे. शाळेमधील ज्ञानरचनावाद, ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थी घेत असलेले शिक्षण, तिसरीपासून सातवीपर्यंत संगणक हाताळणारे विद्यार्थी, साडेतीन लाख रुपयांच्या लोकसहभागातून केलेला शैक्षणिक उठाव, वॉटर प्युरिफायर, हँडवॉश स्टेशन, सुसज्ज रंगकाम या भौतिक सुविधा पाहून सचिव प्रभावित झाले. अभिनव पालकर याचा देशापातळीवरील हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन करतानाच विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण ऐकूनही त्यांनी समाधान व्यक्त केले. याच तालुक्यातील करंबळी तालुक्यातील सहावीचे ३४ विद्यार्थी टॅबचा वापर करतात याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
सरनोबतवाडी (ता.करवीर) येथील शिक्षक अध्यापनात स्वत:च्या लॅपटॉपचा वापर करतात त्याचे सचिवांनी कौतुक केले. या शाळेत चार लाख ३९ हजारचा शैक्षणिक उठाव झाला आहे. कन्या विद्यामंदिर (ता. हातकणंगले)येथील लेझीम पथक, पहिलीच्या वर्गात राबविण्यात येणारा शब्दांचा डोंगर व शब्दांची अंताक्षरी याचे वाचन त्यांनी घेतले. स्वच्छ सुंदर मुलगी-आजची राजकुमारी, वाचनकट्टा, तरंग वाचनालय या उपक्रमांची पाहणी केली.
जिल्ह्यातील चांगल्या उपक्रमांचे एकत्रिकरण करून ते दिल्लीला पाठवून द्यावेत. अन्य राज्यांतील शिक्षक हे उपक्रम पाहण्यासाठी कोल्हापूरला येतील तसेच अन्य राज्यांतही असे उपक्रम राबविण्याबाबत आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे स्वरूप यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, उपाध्यक्ष शशिकांत खोत, सभापती मीना पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले व अन्य अधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Other states to see the schools in Kolhapur district: Anil Swaroop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.