‘गोकुळ’ सभेची चौकशी करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:46 IST2017-10-04T00:45:16+5:302017-10-04T00:46:11+5:30

‘गोकुळ’ सभेची चौकशी करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाबाबत सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी सहायक निबंधक अरुण चौगले यांना दिले आहेत.
‘गोकुळ’च्या दि. १५ सप्टेंबरला झालेल्या ५५ व्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजावर विरोधी आमदार सतेज पाटील यांच्या गटाने हरकत घेतली आहे.
संघाचे संचालक अथवा सक्षम अधिकारी नसताना महादेवराव महाडिक यांनी अहवाल हातात धरून सर्व विषय एका दमात मंजूर कसे केले? असा सवाल करीत सभेच्या झालेल्या कामकाजाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार सतेज पाटील व माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने दि. १९ सप्टेंबरला सहायक निबंधक (दुग्ध) अरुण चौगले यांना निवेदन दिले होते.
चौगले यांनी निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले होते. त्यानुसार विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. ‘गोकुळ’च्या झालेल्या सभेची चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश अरुण चौगले यांना दिले आहेत. त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुद्देनिहाय अहवाल सादर करा
महाराष्टÑ सहकारी संस्था अधिनियम १९६० चे ‘कलम ७५’ व ‘नियम ६०’ मधील तरतुदीनुसार संघाच्या झालेल्या सभेचे कामकाज व निवेदनातील १ ते ८ मुद्द्यांबाबत आपला मुद्देनिहाय सुस्पष्ट अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेली तीन आठवडे गाजत असलेल्या ‘गोकुळ’ सभेच्या कामकाजाची चौकशी होणार असून, या अहवालावरच सभेचे भवितव्य ठरणार आहे.