हाय सिक्युरिटी प्लेट बसविण्यास विरोध, कोल्हापूर जिल्ह्यात ४३ दिवसांत ४ लाख वाहनांना नंबरप्लेट बसविण्याचे अग्निदिव्यच
By सचिन यादव | Updated: February 17, 2025 19:19 IST2025-02-17T19:18:49+5:302025-02-17T19:19:11+5:30
सचिन यादव कोल्हापूर : राज्य परिवहन विभागाने २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) बंधनकारक केली ...

हाय सिक्युरिटी प्लेट बसविण्यास विरोध, कोल्हापूर जिल्ह्यात ४३ दिवसांत ४ लाख वाहनांना नंबरप्लेट बसविण्याचे अग्निदिव्यच
सचिन यादव
कोल्हापूर : राज्य परिवहन विभागाने २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) बंधनकारक केली आहे. त्यासाठी येत्या ३१ मार्चपर्यंतची मुदत आहे. १ एप्रिलपासून ही प्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर केवळ २२२ वाहनांनी ही नंबरप्लेट बसविली असून अत्यल्प प्रतिसाद आहे. येत्या ४३ दिवसांत २०१९ पूर्वीच्या सुमारे ४ लाख वाहनांना ही नंबरप्लेट बसविणे अग्निदिव्यच ठरणार आहे. वाहनधारकांकडून या नव्या यंत्रणेला विरोध होत आहे.
अशी आहे 'एचएसआरपी
- 'निळ्या रंगामध्ये इंग्रजी भाषेत 'आयएनडी'
- अशोक चक्राचा होलोग्राम
- वाहनाचा नोंदणी क्रमांक नंबरप्लेट एम्बॉसिंग करून बसवण्यात येते.
असे आहेत दर
- दुचाकी आणि ट्रॅक्टर : ४५० रुपये
- तीनचाकी : ५०० रुपये
- चारचाकी : ७५० रुपये
- (जीएसटी अतिरिक्त)
सुरक्षिततेसाठी 'एचएसआरपी'
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या सुरक्षेसाठी तयार केली आहे. ही प्लेट एचएसआरपी होलोग्राम स्टीकरसह येते. त्यावर वाहनाचे इंजिन आणि चेसिस क्रमांक लिहिलेला असतो. हा क्रमांक प्रेशर मशीनद्वारे लिहिला जातो. केंद्रीय डाटाबेसमध्ये या सर्व माहितीची नोंद केली जाते.
तीन विभागांत वर्गवारी
नवीन 'एचएसआर' नंबरप्लेट लावण्यासाठी राज्यातील आरटीओत तीन विभाग तयार केले आहेत. पहिल्या विभागामध्ये १२ आरटीओ कार्यालये असून त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश आहे. वाहनांसाठी एचएसआरपी बसवण्यासाठी तीन एजन्सींना नियुक्त केले आहे. त्यात कोल्हापूरसाठी रोस्मर्टा सेफ्टी सिस्टीम लि. या अधिकृत फिटमेंट सेंटर्सची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात २०१९ पूर्वीची ४ लाखांहून अधिक वाहने
नंबरप्लेटची फिटिंग कोणत्या तारखेला सुरू करावी, याचा उल्लेख मार्गदर्शक तत्त्वांत नाही; मात्र काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख निश्चित आहे. जिल्ह्यात सन १ एप्रिल, २०१९ पूर्वीची सुमारे ४ लाखांहून अधिक वाहने आहेत. त्यामध्ये दुचाकी, तीनचाकी, ट्रॅक्टर आणि अन्य वाहने आहेत.
त्याशिवाय ही कामे नाहीत
नंबरप्लेट बसविल्याशिवाय वाहन मालकीचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रात पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, विमा अपडेट आदी वाहन संदर्भातील कामे वाहनांना एचएसआरपी बसविल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच केली जाणार आहेत.
केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार १, एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना एचएसआरपी बसविणे बंधनकारक आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून आदेश आल्यास ही प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई होईल. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी