नवीन प्रादेशिक प्रारूप आराखड्यास उत्तूरकरांचा विरोध
By Admin | Updated: January 24, 2017 23:27 IST2017-01-24T23:27:50+5:302017-01-24T23:27:50+5:30
हरकती दाखल : जमिनी, घरे होणार जमीनदोस्त; रस्ते रुंदीकरण करू देण्यास विरोध

नवीन प्रादेशिक प्रारूप आराखड्यास उत्तूरकरांचा विरोध
रवींद्र येसादे -- उत्तूर --नगररचना प्रादेशिक योजनेंतर्गत उत्तूर, (ता. आजरा) येथील गावचा प्रारूप आराखडा नगररचना विभागाने तयार केला आहे. या आराखड्यात ३०, १८ व ४५ मी. असे तीन रस्त्यांचे रुंदीकरण दाखवल्याने उत्तूरकर हवालदिल झाले आहेत. नवीन रस्ते न करता पूर्वीच रस्ते ठेवा, अशी मागणी करत ग्रामस्थांनी हरकती दाखल केल्या आहेत .
अधिक माहिती अशी, ग्रामस्थांनी उत्तूरपासून गडहिंग्लज, गारगोटी, आजरा, चव्हाणवाडी, धामणे या जोडणाऱ्या रस्त्यांना पूर्वी जमिनी दिल्या आहेत. पुन्हा त्याच ग्रामस्थांच्या जमिनी रस्ता रुंदीकरणात जाणार आहेत. यामध्ये दुकाने, घरे, शेती, एन. ए. प्लॉट, मंदिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती, जागा यांचा समावेश आहे. प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्याने हरकती दाखल केल्या आहेत.
रस्ता रुंदीकरण व नवीन रस्ते यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. उपजीविकेचे साधन असलेली दुकाने, शेती रस्त्यात जाणार असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. नवीन रस्त्यात आंबेओहळ धरणासाठी ज्या धरणग्रस्तांनी व लाभधारकांनी जमिनी दिल्या त्याही नवीन प्रारूप आराखड्यात धरण्यात आल्या आहेत. त्यांनीही हरकती दाखल केल्या आहेत. रस्त्यांच्या शेजारी घरे, एन. ए. प्लॉट कर्ज काढून घेतले आहेत. पूर्वीचे रस्ते असल्याने शासनाचे ना-हरकतीचे दाखले घेऊन खरेदी केले आहेत. रस्ता रुंदीकरणामुळे सारे हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आराखड्यास विरोध सुरू आहे. जुने रस्ते रुंदीकरण न करता वापरा, नव्याने रस्ता करू नका, अशा हरकती दाखल केल्या आहेत.
असा आहे आराखडा ७
४५ मी. रस्ता - गारगोटी - लक्ष्मी देवालय - गडहिंग्लजकडे (रिंगरोड). ३० मी. रस्ता - गोसावी वसाहत - ते पार्वती शंकर विद्यालय (जुना गारगोटी रस्ता ).
१८ मी. रस्ता हुडे माद्याळ -स्वामी समर्थ कॉलनी - स्वस्तिक रोड - तरूक नाला - आजरा रोड रामलिंग पाणंद. (आराखड्यातील नवीन रस्ता)
नवीन प्रादेशिक प्रारूप आराखड्यासंदर्भात ग्रामपंचायतीने हरकत दाखल केली आहे. चर्चेतून मार्ग काढूया, असे अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी लेखी म्हणणे दिले नाही. ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या पाठीशी ठाम आहे.