सत्तारूढ-विरोधकांत आरोप-प्रत्यारोप
By Admin | Updated: January 15, 2015 23:21 IST2015-01-15T23:06:50+5:302015-01-15T23:21:04+5:30
‘पंचगंगा’ निवडणूक : शिरोळ-हातकणंगले तालुक्यांत हालचालींना वेग

सत्तारूढ-विरोधकांत आरोप-प्रत्यारोप
इचलकरंजी : येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमुळे शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्तारूढ पाटील गटाच्या विरोधात मगदूम गटाने सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असले तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.पंचगंगा साखर कारखान्याचे सभासद महाराष्ट्रातील तीन व कर्नाटकातील दोन तालुक्यांत असल्याने ही निवडणूक बहुराज्य सहकारी संस्था अधिनियमान्वये होत आहे. पाच तालुक्यांत १७,७१८ उत्पादक सभासद असले तरी हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील सभासदांची संख्या सुमारे ७० टक्के आहे. उर्वरित सभासद चिकोडी, अथणी व करवीर तालुक्यांत आहेत. संचालकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उत्पादक गटातील १२ जागेसाठी १७ उमेदवार, अनुत्पादक व्यक्ती गटातील एका जागेसाठी २ उमेदवार व संस्था गटाच्या एका जागेसाठी एक उमेदवार शिल्लक राहिले. परिणामी, उत्पादक गटाच्या १२ जागा व अनुत्पादक व्यक्ती गटाची एक जागा यासाठी २४ जानेवारीला मतदान घेण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम यांनी सर्वसाधारण सभेत दिली.
कारखान्याचे सभासद पाच तालुक्यांतील १२१ गावांत असल्याने अवघ्या दहा दिवसांत या गावातील सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यमान अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्या पॅनेलमधील उमेदवारांनी १२ जानेवारीपासूनच संपर्क दौरा सुरू केला आहे; तर मगदूम गटानेही चिकोडी तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन सभासदांना आपली भूमिका सांगण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय संदर्भ बदलले आहेत. या बदललेल्या राजकीय परिस्थितीत कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावच्या नेत्यांना भेटताना दोन बाजूच्या नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)
निवडणूक लादल्याची परस्परांवर टीका
पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अनेक मान्यवरांची इच्छा असताना सुद्धा विरोधकांना एकही जागा देणार नाही, असा हेका सत्ताधाऱ्यांचा आहे.
पैसा आणि सत्तेच्या जोरावर सभासदांवर सत्ताधाऱ्यांनी निवडणूक लादली, अशी टीका निवृत्त कामगार संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब शहापुरे यांनी केली.
कारखान्याची निवडणूक लागू नये, यासाठी विरोधकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच म्हणणे कळविले होते; पण त्याला प्रतिसादच दिला नाही.
उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशीसुद्धा आम्हाला झुलवत ठेवले आणि फसविले. त्यामुळे निवडणूक लागल्याचा आरोप सत्तारूढ गटाच्या प्रवक्त्याने दिला.