हाणामारीमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा उघड

By Admin | Updated: October 29, 2015 00:47 IST2015-10-29T00:40:26+5:302015-10-29T00:47:26+5:30

महेश जाधव यांची टीका : पराभव दिसू लागल्यानेच लाटकरांचा तोल ढळला

Opening the NCP's true face due to the violence | हाणामारीमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा उघड

हाणामारीमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा उघड

कोल्हापूर : शिवाजी पार्कसारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये टोळकी घेऊन मारामारी करण्याची प्रवृत्ती घातक स्वरूपाची आहे. अनेक गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना महापालिकेत प्रवेश देणे धोक्याचे ठरेल. हाणामारीमुळे या पक्षाचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी केली. भाजप-ताराराणी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी यशवंत लॉन येथे मंगळवारी (दि. २७) आयोजित विशेष प्रचारसभेत ते बोलत होते.
महेश जाधव पुढे म्हणाले, ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, अशा राजू लाटकर यांनी, शिवाजी पार्कसारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये हाणामारीसारखे घृणास्पद प्रकार केले. महापालिका निवडणुकीतील स्वत:चा आणि पक्षाचा पराभव ठळकपणे दिसू लागल्यानेच त्यांचा तोल ढळला आहे. त्यामुळेच ते अशा गोष्टी करीत आहेत. आता सर्वसामान्यांनीच अशा घातक प्रवृत्तीला दूर लोटण्यासाठी भाजप-ताराराणी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाचे शहराध्यक्षच हाणामारी करीत असतील तर एरव्ही त्यांची किती दहशत असेल याची कल्पनाच केलेली बरी, असा टोलाही जाधव यांनी लगावला.
शहर आणि प्रभागातील ही गुंडगिरी संपविण्यासाठी तसेच असली प्रवृत्ती संपवून परिस्थिती बदलण्यासाठी सुवर्णा साळोखे, संजीवनी शेटे, संगीता सावंत, शोभा बामणे यांच्यासह भाजप-ताराराणी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन महेश जाधव यांनी केले.
यावेळी सभेला अशोक देसाई, हेमंत आराध्ये यांच्यासह साळोखेनगर, कळंबा फिल्टर हाऊस, देवकर पाणंद, तपोवन, राजलक्ष्मीनगर या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Opening the NCP's true face due to the violence