‘गोकुळ’च्या निविदा संचालकांसमोरच उघडा, शौंमिका महाडिक : अध्यक्षांना लिहिले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:25 IST2021-07-31T04:25:05+5:302021-07-31T04:25:05+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाकडे (गोकुळ) येणाऱ्या विविध निविदा थेट संचालक मंडळासमोरच उघडल्या जाव्यात, अशी मागणी संचालिका ...

‘गोकुळ’च्या निविदा संचालकांसमोरच उघडा, शौंमिका महाडिक : अध्यक्षांना लिहिले पत्र
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाकडे (गोकुळ) येणाऱ्या विविध निविदा थेट संचालक मंडळासमोरच उघडल्या जाव्यात, अशी मागणी संचालिका शौमिका महाडिक यांनी अध्यक्षांकडे पत्रान्वये गुरुवारी केली.
या पत्रात म्हटले आहे, आता या निविदा आधी संबंधित अधिकाऱ्यांसमोर उघडून त्या निविदांमध्ये दिलेल्या प्रस्तावांची यादी बनवून ती संचालक मंडळासमोर सादर केली जाते. तसे न करता संपूर्ण प्रक्रिया संचालक मंडळाच्या उपस्थितीतच पार पाडावी. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता येईल. मागील काळामध्ये आलेल्या निविदांची यादी बनवून त्यापैकी ज्यांचा प्रस्ताव संघासाठी किफायतशीर असेल, त्यांच्याशी चर्चा करून प्रस्तावाला मान्यता दिली जायची. पण अलीकडच्या काळात या प्रक्रियेत बदल करून आपण निर्णय घेतला आणि प्रस्ताव मान्यतेचे अतिरिक्त अधिकार स्वतःच्या अखत्यारित ठेवले. हे अधिकार आपल्याकडे घेताना दिलेल्या कारणांमध्ये काही तथ्य नाही. कमी दरात सेवा पुरवणारे पुरवठादार योग्य पद्धतीने सेवा पुरवत नाहीत व कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांनी सेवा खंडित केली तर त्याचे नुकसान संघाला सोसावे लागेल, या शक्यतेला कसलाही आधार नाही. कारण प्रस्ताव मान्य केल्यानंतर त्या पुरवठादाराची संघाकडे अनामत रक्कम असते. म्हणूनच याआधी असे वाईट अनुभव संघाला कधी आलेले नाहीत. दुर्दैवाने असा प्रकार घडलाच तर अनामत रक्कम जप्त करून कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकारही संघाकडे आहेत. पण आपण आता घेतलेल्या निर्णयामागे स्पष्ट राजकीय हेतू आहे. भले संघाचे नुकसान झाले तरी चालेल परंतु आपल्या माणसांचेच प्रस्ताव मंजूर झाले पाहिजेत, अशी आपली भूमिका त्यामागे दिसते.