गळीत हंगामाचा मुहूर्त १५ ऑक्टोबर नव्हे, नोव्हेबरलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 06:06 PM2020-06-27T18:06:13+5:302020-06-27T18:07:37+5:30

यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या समितीने जाहीर केला असला तरी कोल्हापुरात तो प्रत्यक्षात येणे अवघडच आहे. दसऱ्यापर्यंत लांबणारा परतीचा पाऊस आणि जोडीला कोरोना आणि मजुरांची उपलब्धता यामुळे मोळ्या गव्हाणीत पडायला नोव्हेंबर उजाडणार आहे.

The onset of the wet season is not October 15, but November | गळीत हंगामाचा मुहूर्त १५ ऑक्टोबर नव्हे, नोव्हेबरलाच

गळीत हंगामाचा मुहूर्त १५ ऑक्टोबर नव्हे, नोव्हेबरलाच

Next
ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा मोठा अडथळा दसरा-दिवाळीनंतरच हंगाम वेग घेणार

कोल्हापूर : यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या समितीने जाहीर केला असला तरी कोल्हापुरात तो प्रत्यक्षात येणे अवघडच आहे. दसऱ्यापर्यंत लांबणारा परतीचा पाऊस आणि जोडीला कोरोना आणि मजुरांची उपलब्धता यामुळे मोळ्या गव्हाणीत पडायला नोव्हेंबर उजाडणार आहे.

साधारपणे मंत्री समिती १ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याचा दरवर्षी आग्रह धरते; पण तो प्रत्यक्षात येत नसल्याने यावर्षी तो १५ दिवसांनी पुढे धरण्यात आला आहे. पुणे, नगर, सोलापूर, मराठवाड्यात हा मुहूर्त ठीक आहे; पण कोल्हापूर, सांगली या ऊसपट्ट्यात या मुहूर्ताला कारखान्याची धुराडी पेटूच शकत नाहीत. या काळात परतीचा पाऊस सुरू असतो.

यावर्षी दसरा २५ ऑक्टोबरला आहे, तर दिवाळी १६ नोव्हेंबरला संपते. दसरा झाल्यावरच हंगामाची तयारी सुरू होते. १ नोव्हेंबरपासून मजुरांना आणायचे म्हटले त्यांना आणेपर्यंत दिवाळी सुरू होते. त्यामुळे दसऱ्यानंतर हंगाम सुरू झाला तरी गती घ्यायला दिवाळी संपण्याची वाट तोडणी मजूर पाहतात.

उसाचे क्षेत्र वाढले

यंदा अनुकूल हवामानामुळे ऊस पीक जोमदार आले आहे. मुबलक पाण्यामुळे उसाचे क्षेत्रही वाढले आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख ५८ हजार हेक्टर निव्वळ लागण; तर एक लाख हेक्टर हे खोडव्याचे क्षेत्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत १५ ते २० हजार हेक्टरनी उसाचे क्षेत्र वाढले आहे. प्रत्यक्षात एक लाख ६० मेट्रिक टन ऊस गाळपास येईल आणि १०० लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे.


हंगाम किमान १३०, तर कमाल १६० दिवसांचा

यंदा उसाची मुबलक उपलब्धता असल्याने साखर कारखान्यांचा उसाचा दुष्काळ संपणार आहे. हंगाम किमान १३०, तर कमाल १६० ते १८० दिवसही चालेल, असा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या वर्षी १०० दिवसांचा हंगाम गाठताना कारखान्यांची दमछाक झाली होती. या वर्षी ती कसर भरून निघणार आहे.

आंदोलन दरासाठी नव्हे; तर टप्पा टाळण्यासाठी

गळीत हंगामाचा सरकारी मुहूर्त निघाला तरी प्रत्यक्ष धुराडी कधी पेटणार हे शेतकरी संघटनेच्याच हातात असते. गेली १७ वर्षे हेच गणित जिल्ह्यात राहिले आहे. एफआरपीच किमान तीन हजार रुपये टनावर दराची उत्सुकता संपली असली तरी ती किती टप्प्यात यावरून मात्र रान पेटणार आहे. दरवर्षी स्वाभिमानी हे रान पेटवत होती; पण यावर्षी स्वाभिमानी सत्तेत असल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे; पण त्यांची जागा घेण्यासाठी विरोधी धनाजी चुडमुंगे, शिवाजीराव माने, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत यांनी आतापासून पेरणी सुरू केल्याने आंदोलनाची धग कायम राहणार असल्याचे दिसत आहे.



यंदाचा गळीत हंगाम साखर कारखान्यांची परीक्षा पाहणारा ठरणारा आहे. उसाची मुबलक उपलब्धता ही जमेची बाजू असली तरी साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता, एफआरपी भागवण्याइतपत ऐपत तयार करण्यासाठी थकहमीचा आरबीआयकडून तयार झालेला गुंता सरकारने तातडीने सोडवायला हवा. अन्यथा कारखानेच सुरू होऊ शकले नाहीत तर शिल्लक उसाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे.
- विजय औताडे,
माजी कार्यकारी संचालक आणि साखर उद्योगातील अभ्यासक

Web Title: The onset of the wet season is not October 15, but November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.