...तरच बिरंजे यांना पाठिंबा
By Admin | Updated: May 29, 2015 23:58 IST2015-05-29T22:12:10+5:302015-05-29T23:58:36+5:30
अजित जाधव यांची घोषणा : इचलकरंजी पालिकेत ‘शविआ’, डाळ्या, कारंडे गटाची सत्ता हवी

...तरच बिरंजे यांना पाठिंबा
इचलकरंजी : नगरपालिकेमध्ये शहर विकास आघाडी, कॉँग्रेसमधील डाळ्या गट व राष्ट्रवादीचा कारंडे गट यांचीच सत्ता राहणार असेल, तर नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना पाठिंबा राहील, अन्यथा आमदार सुरेश हाळवणकर व ‘शविआ’चे प्रमुखांच्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊन पुढील धोरण ठरविण्यात येईल, अशी घोषणा शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली.
नगराध्यक्षा बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन जानेवारीमध्ये बंड केले. त्यांच्या बंडास ‘शविआ’, राष्ट्रवादीतील कारंडे गट व कॉँग्रेसमधील डाळ्या गट यांनी पाठिंबा दिला आणि नगराध्यक्षांना बहुमत दिले. त्यानंतर राहिलेल्या कॉँग्रेसने व राष्ट्रवादीतील जांभळे गटानेही पाठिंबा दिला. त्यामुळे नगरपालिकेतील विरोधी पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले आणि सर्वच ६२ नगरसेवक सत्तेत आले.
सर्वच सत्तेत असल्याने ‘शविआ’ला अपेक्षित प्रतिसाद किंवा सत्तेतील सहभाग मिळेना. त्यामुळे ‘शविआ’मध्ये अस्वस्थता पसरली. ‘शविआ’चे नगरसेवक प्रमोद पाटील यांनी बांधकाम विभागातील कामाबाबत तक्रार केली. त्यापाठोपाठ तशाच आशयाची तक्रार ‘शविआ’चे कार्याध्यक्ष जयवंत लायकर यांनीही केली, तर नगरसेवक संतोष शेळके यांनी प्रभागात स्वच्छता व कचरा उठाव होत नाही आणि नागरी सेवा-सुविधा मिळत नसल्याच्या विरोधात नगरपालिकेसमोर उपोषण केले. अशा घडामोडींमुळे शहर विकास आघाडी व नगराध्यक्षा बिरंजे यांच्यात अवघ्या चार महिन्यांत दुरावा निर्माण होत असल्याचा सुगावा लागला.
अशा पार्श्वभूमीवर शुक्रवारी जलतरण तलावावरील क्लस्टर कार्यालयात ‘शविआ’चे मोहन कुंभार वगळता सर्व नगरसेवक-नगरसेविकांची बैठक झाली. बैठकीतील पालिकेतील संभ्रमाच्या कामकाजाबाबत नगरसेवक-नगरसेविकांनी नाराजी व्यक्त केली, असे सांगून पक्षप्रतोद जाधव म्हणाले, दोन तास झालेल्या बैठकीत नगराध्यक्षांच्या पाठिंब्याबाबत उपरोक्त मुद्द्यावर एकमत झाले. नगरपालिकेत ‘शविआ’चे १७, डाळ्या गटाचे १२ व कारंडे गटाचे ४ अशा ३३ नगरसेवकांची सत्ता राहणार असेल तरच नगराध्यक्षा बिरंजे यांना
पाठिंबा देण्याच्या निर्णयावर सर्वजण ठाम आहेत. शनिवारी होणाऱ्या पालिकेच्या सभेनंतर नगराध्यक्षा बिरंजे यांना हा निर्णय सांगितला जाईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
प्रमुखांची बैठक
आणि पुढील दिशा
नगराध्यक्षा बिरंजे यांना पाठिंबा देताना आमदार हाळवणकर, बादशहा बागवान, सागर चाळके, अजित जाधव, अशोक स्वामी, जयवंत लायकर व तानाजी पोवार यांची बैठक झाली होती. त्याप्रमाणे आता पुन्हा याच प्रमुखांची बैठक होईल आणि नगराध्यक्षा बिरंजे यांना पाठिंबा व पालिकेतील धोरण ठरविले जाईल, असेही अजित जाधव यांनी सांगितले.
शहर विकास आघाडीमधील खदखद
‘शविआ’चे प्रमोद पाटील हे प्रमुख नगरसेवक आहेत. त्यांनी बांधकाम विभागाकडील कामाविषयी तक्रार केली असताना त्याकडे नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी दुर्लक्ष केले. वास्तविक पाहता नगराध्यक्षांनी प्रमुखांची बैठक घेऊन त्यामध्ये पाटील यांच्या तक्रारीचा खुलासा व निवारण करणे आवश्यक होते, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.