आॅनलाईन अमली पदार्थांची विक्री खुलेआम
By Admin | Updated: July 2, 2015 01:14 IST2015-07-02T01:13:32+5:302015-07-02T01:14:46+5:30
पोलिसांसाठी डोकेदुखी : शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह उच्चभ्रू व्यक्तींकडून मागणी

आॅनलाईन अमली पदार्थांची विक्री खुलेआम
एकनाथ पाटील -कोल्हापूर -‘मेफेड्रोन’(ड्रग्ज), अफू, चरस, गांजा, भांग अशा अमली पदार्थांची खुलीसह आॅनलाईन विक्री शहरासह उपनगरांत खुलेआम सुरू आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह शहरातील उच्चभ्रू वर्गातील काही व्यक्तींकडून व्यसनासाठी अमली पदार्थांची आॅनलाईन मागणी होत आहे. हे आॅनलाईन रॅकेट मात्र पोलिसांची डोकेदुखी बनत आहे.
राज्यात अमली पदार्थ विक्रीसाठी शासनाने बंदी घातली आहे; परंतु छुप्या मार्गाने आजही या पदार्थांची विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, कोल्हापुरात हायफाय अमली पदार्थांची मागणी वाढत असल्याचे भयावह चित्र आहे. अफू, चरस, गांजा, भांग यांसारख्या पारंपरिक अमली पदार्थांची चलती आहे. शहरातील उच्चभ्रू वर्गातील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून अशा अमली पदार्थांचे सेवन करीत आहेत. त्यांच्याकडून व्यसनासाठी अमली पदार्थांची मागणी केली जात आहे. या अमली पदार्थांची देवघेव करण्यासाठी रॅकेट आहेत.
ती अनेक छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडून ग्राहकांपर्यंत पुरवठा करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांचे व्यवहार सांकेतिक भाषेत चालतात. त्यांच्याकडून प्रत्येक अमली पदार्थासाठी एक विशिष्ट सांकेतिक शब्द (कोड) तयार करण्यात आला आहे. या अमली पदार्थांची गुजरात, जम्मू-काश्मीरमधून देशभरात तस्करी केली जात असल्याचे समजते. काही अमली पदार्थांचा हॉटेलमधील खाद्यपदार्थांमध्येही वापर केला जात असल्याचे समजते.
तरुणांचा गुन्हेगारीकडे प्रवास
फेब्रुवारी २०१५ मध्ये इस्लामपूर येथे एका खासगी बसमध्ये ‘मेफेड्रोन’(ड्रग्ज)चा साठा पोलिसांना मिळून आला होता. या कारवाईवरून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले होते. मेफेड्रोन ड्रग्ज हा साखरेसारखा पांढरा पदार्थ असून त्याला कोणत्याही प्रकारची चव नाही. त्याचे चहा, कॉफी, थंड पेये, आदींद्वारे सेवन करता येते. त्याचा नशेचा कालावधी दीर्घ असल्याने तरुण पिढी या अमली पदार्थांकडे जास्त आकर्षित व प्रभावित होत आहे. त्याची किंमतही जास्त असल्याने तो खरेदी करण्यासाठी वेळप्रसंगी तरुण पिढी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे.
अशी होते विक्री
अमली पदार्थांची मागणी करताना ती मोबाईल एसएमएस, वॉट्स अॅप व ई-मेलद्वारे विशिष्ट कोडद्वारे केली जाते. त्यानंतर तो पदार्थ एजंटाद्वारे थेट गिऱ्हाइकापर्यंत पोहोचविला जातो. त्यापूर्वी संबंधित गिऱ्हाइकाची पूर्णत: खात्री केली जाते.
दहा वर्षांची शिक्षा
अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पोलीस कारवाई झाल्यानंतर त्यांना या प्रकरणात कमीत कमी दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.
अमली पदार्थांचा साठा किंवा व्यापार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिले आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे. अमली पदार्थांची विक्री कोठे होत असल्यास त्याची माहिती ०२३१-२६६५६१७ या फोन क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
- दिनकर मोहिते;
पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग