एकाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही

By Admin | Updated: November 24, 2015 00:22 IST2015-11-23T23:44:18+5:302015-11-24T00:22:27+5:30

राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

One student will not be deprived of education | एकाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही

एकाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही


गडहिंग्लज : शिक्षण हक्क कायद्यानुसार २० पटाखालील शाळांसंबंधी चर्चा सुरू असली तरी कोणत्याही परिस्थितीत एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बुडणार नाही, याची दक्षता शासन घेईल, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत शाळा भेटीच्या निमित्ताने ते गडहिंग्लजला आले होते. येथील विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटसंख्येच्या निकषामुळे संबंधित शाळा बंद झाली तरी नजीकच्या शाळेत आणून त्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल, असे स्पष्ट करतानाच अशा शाळांवरील गंडांतराला त्यांनी अप्रत्यक्षरीत्या दुजोराच दिला.
सरकारी शाळा टिकविण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या पाल्यांना सरकारी शाळेतच शिकविण्याचा आग्रह लोकप्रतिनिधींकडून धरला जात आहे. त्याबाबत छेडले असता ते म्हणाले, नागरिकांप्रमाणे शासकीय नोकरांनाही स्वातंत्र्य आहे. असा आग्रह केवळ नैतिकदृष्ट्या बरोबर आहे. मात्र, घटनाबाह्य सक्ती त्यांच्यावर करता येणार नाही.
गुणवत्तेला केवळ शिक्षकच जबाबदार नाही. ज्या समाजात त्याची जडणघडण झाली, त्या समाजव्यवस्थेचा दोष आणि अपयशही त्यास कारणीभूत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुलांच्या मागणीनुसारच स्वयंमअर्थसहाय्यित शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना ‘चॉईस्’ उपलब्ध झाला आहे. सर्वच शाळांचे अस्तित्व काळाच्या कसोटीवर अवलंबून असले तरी एकही मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याकडे शासनाचे कटाक्ष राहील.
शाळाबाह्य मुलांच्या संख्येबाबत विचारले असता ते म्हणाले, या मोहिमेत एका बीड जिल्ह्यात ११,००० विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले आहे. ऊसतोडणी, दगडखाण आणि वीटभट्ट्यांवरील कामगारांच्या मुलांबरोबर भटक्या जाती-जमातीच्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असेही नंदकुमार यांनी स्पष्ट केले.
यावेळी माध्यमिक शिक्षण संचालक एम. के. जरग, माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, गटशिक्षणाधिकारी गणपतराव कमळकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

‘दुंडगे’सारखी
शाळा पाहिली नाही
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंतच्या शाळांना भेटी दिल्या. मात्र, गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगेसारखी शाळा अजून पाहिली नव्हती.
ही शाळा बघून धक्काच बसला. कन्नड भाषिक गाव असून, येथील पहिलीचा वर्ग खूप छान तयार झाला आहे. असाच प्रत्यय मला हेळेवाडी व नेसरीत आला. ज्ञानरचनावादी वर्गाचे काम गडहिंग्लज तालुक्यात चांगले झाले आहे, अशी प्रतिक्रिया नंदकुमार यांनी व्यक्त केली.

Web Title: One student will not be deprived of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.