एक बंद, दोन सिग्नल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: February 23, 2015 23:59 IST2015-02-23T21:34:08+5:302015-02-23T23:59:57+5:30
अपघाताचे वाढते प्रमाण : संभाजीनगर चौक, क्रशर चौक, हॉकी स्टेडियम चौकात वाहतुकीचा बोजवारा

एक बंद, दोन सिग्नल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
अमर पाटील-कळंबा -वाहनांच्या वाढत्या संख्येने उद्भवणारी रहदारीची समस्या व अपघातांचे वाढते प्रमाण गांभीर्याने घेऊन उपनगरात तीन ठिकाणी वाहतूक नियंत्रक सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली. संभाजीनगर पेट्रोल पंपासमोरील सिग्नल नव्याचे नऊ दिवसांप्रमाणे कार्यान्वित राहिले, तर क्रशर चौकात व हॉकी स्टेडियम चौकात स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांअभावी असणारे सिग्नल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. सिग्नल तीन मात्र वाहतुकीच्या शिस्तीचे तीन तेरा वाजले आहेत.
संभाजीनगर चौक, क्रशर चौक, हॉकी स्टेडियम चौक हे शहरालगत असणाऱ्या सर्व उपनगरांना व ग्रामीण भागांना जोडणारे मुख्य रस्ते आहेत. या चौकात सिग्नल असूनही वाहतुकीचा बोजवारा नित्याचा आहे. एकाचवेळी कळंबा, गारगोटी मार्गे येणाऱ्या वाहनांनी संभाजीनगर चौक, राधानगरी फुलेवाडी मार्गे येणाऱ्या वाहनांनी क्रशर चौक, सायबर मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांनी हॉकी स्टेडियम चौकात गर्दी होते. त्यामुळे येथे अपघात होतात.
या सर्व परिसरात शाळा, हॉस्पिटल, मंगल कार्यालये, हॉटेल्स, आयटीआय, कळंबा जेल, बॅँका असल्याने भरधाव वाहनधारकांवर चाप बसवण्यासाठी स्पीड ब्रेकर करणे आवश्यक आहे. पदपथ किरकोळ विक्रेत्यांनी व्यापल्याने हमरस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. रस्त्यावर असणाऱ्या वडापच्या गाड्या , पिकअप शेडअभावी उभे असलेले प्रवासी यामुळे समस्या गंभीर होत आहे.
वाहतुकीची समस्या
एकाचवेळी चार मुख्य मार्गांवरून येणाऱ्या वाहनांनी वाहतूक ठप्प
स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांअभावी अपघातात वाढ
गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रकाअभावी शिस्त कोलमडलेली
पदपथावरील विक्रेते, पिकअपशेडअभावी प्रवासी यामुळे खोळंबा
उपाय गरजेचे
किमान गर्दीच्यावेळी सिग्नल कार्यान्वित, वाहतूक नियंत्रक आवश्यक
योग्य अंतरावर, योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर करणे
झेब्रा क्रॉसिंगपट्टे आवश्यक
पदपथावरील विक्रेते अन्यत्र हलवावेत
चौकात प्रवासी पिकअपशेडची गरज
सिग्नलमध्ये नियमितता हवी