एक सदस्यीय प्रभाग रचना प्रक्रिया सुरू
By Admin | Updated: April 10, 2015 23:40 IST2015-04-10T23:12:22+5:302015-04-10T23:40:53+5:30
इचलकरंजी नगरपालिका : संभाव्य लोकसंख्यावाढीला अनुसरून होणार निवडणुका

एक सदस्यीय प्रभाग रचना प्रक्रिया सुरू
राजाराम पाटील - इचलकरंजी सन २०१६ मध्ये होणाऱ्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी त्यावेळच्या संभाव्य लोकसंख्येला अनुसरून प्रभाग रचना तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग रचना पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असल्याने संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच आपल्या प्रभागामध्ये ‘फिल्डिंग’ लावण्याची तयारी चालू केली आहे. प्रभागातील समस्या व नागरी सेवा-सुविधांसाठी या भावी उमेदवारांकडून नगरपालिकेमध्ये शिष्टमंडळे व मोर्चे आणले जात आहेत.महाराष्ट्रातील सुमारे २२५ नगरपालिका व नगरपंचायतींच्या विद्यमान लोकप्रतिनिधी, नगरसेवकांच्या मुदती डिसेंबर २०१६ मध्ये संपुष्टात येत आहेत. त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम घेणे शासनाला क्रमप्राप्त आहे. याची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात त्या जिल्ह्यातील नगरपालिकांच्या संबंधित अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंत्रालयातून संभाव्य लोकसंख्येच्या आधारे प्रभाग रचना करण्याकरिता प्रारूप नकाशा सर्व नगरपालिकांनी पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता संबंधित नगरपालिकांमधील नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच नवीन होणारी प्रभाग रचना कशी असावी, प्रभागाचे अनुक्रम कोणत्या प्रकारे असावेत, याबाबत मात्र शासनाने गोपनीयता पाळली आहे.सन २०११ मधील नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत असताना चार सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे पॅनेल पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या. इचलकरंजीसारख्या मोठ्या शहरात अधिक लोकसंख्या पर्यायाने अधिक मतदारसंख्या असलेले हे प्रभाग सर्वसाधारणत: तेरा हजार मतदारसंख्येपासून वीस हजार मतदारसंख्येपर्यंत झाल्यामुळे त्यावेळी प्रचार करताना संभाव्य उमेदवारांची दमछाक झाली. या पॅनेल पद्धतीचा फटका अनेक चांगल्या उमेदवारांना बसला. तर काही उमेदवारांना मात्र अचानकपणे संधीही मिळाली.सध्याच्या भाजप-शिवसेना सरकारने नगरपालिकांच्या निवडणुका एक सदस्यीय प्रभाग रचनेने होतील, असे जाहीर केले आहे. साधारणत: आणखीन दीड वर्षानंतर प्रत्यक्षात निवडणुकांचे वारे वाहू लागेल; पण प्रभागामध्ये तयारी करणाऱ्या संभाव्य नगरसेवकांना मात्र आताच डोहाळे लागले आहेत. तसेच भावी नगरसेवक त्यांच्या प्रभागातील विविध समस्या व नागरी सुविधा यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी नगरपालिकेमध्ये लोकांची शिष्टमंडळे घेऊन पदाधिकाऱ्यांना भेटू लागले आहेत. त्या समस्यांची किंवा नागरी सुविधांची तीव्रता अधिक असेल, तर नगरपालिकेवर मोर्चेही काढले जात आहेत. परिणामी नगरपालिकांमध्ये आता गर्दी दिसू लागली आहे.
नगरसेवकांच्या संख्येत लक्षणीय वाढ
सन २०११ च्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होताना त्या सन २००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहित धरून झाल्या होत्या. त्यामुळे इचलकरंजीसारख्या नगरपालिकेत पूर्वीइतकेच ५७ नगरसेवक राहिले. मात्र, आता इचलकरंजी शहरची २०११ च्या जनगणनेनुसार दोन लाख ८७ हजार लोकसंख्या झाली आहे. तर कबनूरचा काही भाग इचलकरंजीत समाविष्ट झाल्याने ही लोकसंख्या दोन लाख ९२ हजार ६० इतकी झाली आहे. त्यामुळे या लोकसंख्येला ६२ नगरसेवक जनतेतून निवडून देणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे राज्यातील अन्य मोठ्या शहरांतसुद्धा नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार आहे.
नगराध्यक्ष निवडीचे अधिकार जनतेला
सन २००१ मध्ये नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत असताना नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडण्याचे अधिकार सर्वच मतदारांना देण्यात आले होते.
त्याप्रमाणे पुन्हा नगरसेवकांबरोबरच नगराध्यक्ष निवडण्याचे अधिकार शहरातील सर्वच मतदारांना द्यावेत. ज्याचा फायदा भाजप-शिवसेना यांच्या संभाव्य नगराध्यक्षांना होईल, असे मत सध्या सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेनेच्या नेतेमंडळींना वाटत आहे. त्यामुळे पुन्हा जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.