लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी : गारगोटी येथील इंजुबाई कॉलनीत राहणाऱ्या साहिल राजाराम कांबळे यांच्या बंद दाराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी एक लाख बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या चोरीबाबतची फिर्याद साहिल कांबळे यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे. गारगोटी येथील इंजुबाई कॉलनीत साहिल राजाराम कांबळे (मूळ गाव आरळगुंडी, ता. भुदरगड) यांचे घर आहे. ते गुरुवार, २९ जानेवारी रोजी बाहेरगावी गेल्याने घर बंद होते. त्यानंतर ते रविवारी दुपारी साडेअकरा वाजता घरी आल्यानंतर त्यांना समोरच्या दोन्ही दरवाजांचा कडी-कोयंडा उचकटलेला दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, घरातील तिजोरीत ठेवलेले दीड तोळ्यांचे मंगळसूत्र, दोन तोळ्यांचे गंथन, लहान बाळाचे वाळेतोडे, बिंदल्या, चांदीच्या बांगड्या, आठ जोडवी असा एकूण एक लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.