विभागीय कार्यालयात अधिकारी हजर.. पण तक्रारदारच गैरहजर; कोल्हापूर शहरातील समस्याच संपल्या की काय?
By पोपट केशव पवार | Updated: September 17, 2025 13:48 IST2025-09-17T13:47:29+5:302025-09-17T13:48:07+5:30
सहाय्यक आयुक्त नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून तत्काळ कार्यवाही करणार

छाया-आदित्य वेल्हाळ
पोपट पवार
कोल्हापूर : महानगरपालिका विभागीय कार्यालयात सहाय्यक आयुक्तांना पूर्णवेळ बसवून नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचा उपक्रम निर्णय स्तुत्य असला तरी अजूनही या उपक्रमाला नागरिकांचा तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. प्रत्येक मंगळवारी सहाय्यक आयुक्त दोन तास नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून तत्काळ कार्यवाही करणार आहेत. मात्र, चारही विभागांमध्ये मंगळवारी प्रत्येकी पाच ते सहा तक्रारींवर एकही तक्रार आली नसल्याने नेमकी या उपक्रमाबाबत जागृती नाही की शहरातील समस्याच संपल्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आयुक्तांना प्रदान केलेले अधिकार त्यांनी प्रभाग स्तरावर विकेंद्रित करुन सहाय्यक आयुक्तांना ते अधिकार दिले आहेत. त्यामुळे चारही विभागीय कार्यालयात सहाय्यक आयुक्तांना पूर्णवेळ बसण्यास सांगितले आहे. या चार विभागीय कार्यालयांमार्फत नागरिकांना अधिक वेगाने व कार्यक्षमतेने महापालिकेच्या सेवा मिळण्यास मदत होणार आहे. मात्र, प्रशासकांनी घेतलेल्या या निर्णयाची माहिती शहरातील अनेक नागरिकांना नाही. अजूनही झाडाच्या फांद्या तोडणे, कचरा, ड्रेनेज, अतिक्रमणाच्या तक्रारी महापालिकेच्या मुख्यालयातच जात आहेत. त्यामुळे प्रभाग क्षेत्र कार्यालयात बसणाऱ्या सहाय्यक आयुक्तांना रिकामे बसण्याची वेळ आली आहे.
नगर रचनाच्या अधिकाऱ्यांना वेळ मिळेना
विभागीय कार्यालयांमध्ये प्रत्येक मंगळवारी नागरिकांच्या भेटीवेळी पाणीपुरवठा, अतिक्रमण, बांधकाम, नगररचना, आरोग्य यासह प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रभाग क्षेत्र कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या आहेत. मात्र, नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांनी नेमक्या तक्रारी करायच्या कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या मंगळवारी काही विभागीय कार्यालयात नगर रचनाचे संबंधित अधिकारी आलेच नसल्याचे दिसून आले.
यंत्रणाही अपुरी, काम होईल का याबाबत शंका
सहाय्यक आयुक्तांना विभागीय स्तरावर अधिकार दिले असले तरी येथे यंत्रणा मात्र अपुरीच आहे. ड्रेनेज किंवा तत्सम कामासाठी एखादा जेसीबी, टिप्पर हवा असेल तर तोही मुख्य कार्यालयाकडूनच गॅरेजमधूनच मागवून घ्यावा लागतो. त्यामुळे तक्रारीनंतर तत्काळ समस्या सोडविण्यासाठीही मर्यादा येत आहेत.
कोणत्या प्रभागात किती तक्रारी
विभाग - तक्रार
- विभागीय कार्यालय क्र.१ गांधी मैदान : ५
- विभागीय कार्यालय क्र.२ छत्रपती शिवाजी मार्केट : - १
- विभागीय कार्यालय क्र.३ राजारामपुरी : - ४
- विभागीय कार्यालय क्र.४ ताराराणी मार्केट : ०१
मंगळवारी दुपारपर्यंत माझ्याकडे अतिक्रमणाबाबत एक तक्रार आली आहे. पण नागरिकांमध्ये याबाबत जागृती झाल्यानंतर ते स्वत:हून तक्रार घेऊन येतील. - कृष्णा पाटील, सहाय्यक आयुक्त, ताराराणी मार्केट विभाग कार्यालय