लोकसभेच्या भत्त्यापासून अजूनही अधिकारी, कर्मचारी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 15:00 IST2019-09-27T14:59:47+5:302019-09-27T15:00:57+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी राबलेल्या अधिकारी. कर्मचाऱ्यांच्या कामाचे भत्ते अद्यापही निवडणूक विभागाकडून न मिळाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यातील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा नियुक्ती झाली आहे. मागचा भत्ता अद्याप मिळालेला नसताना विधानसभेचा भत्ता तरी मिळतो की नाही, अशी शंका त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.

लोकसभेच्या भत्त्यापासून अजूनही अधिकारी, कर्मचारी वंचित
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी राबलेल्या अधिकारी. कर्मचाऱ्यांच्या कामाचे भत्ते अद्यापही निवडणूक विभागाकडून न मिळाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यातील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा नियुक्ती झाली आहे. मागचा भत्ता अद्याप मिळालेला नसताना विधानसभेचा भत्ता तरी मिळतो की नाही, अशी शंका त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला भारत निवडणूक आयोगाकडून कामकाज भत्ता दिला जातो; परंतु ही निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी अद्याप अधिकारी व कर्मचाऱ्यांना भत्ता मिळाला नसल्याचे चित्र आहे. यातील मतदान व मतमोजणीसाठी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भत्ता देण्यात आला आहे, असा दावा जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आला आहे; परंतु याव्यतिरिक्त महिनाभर केलेल्या कामाचा भत्ता मिळाला नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
निवडणुकीच्या काळात भत्त्यावरून शिक्षकांनीही निवडणूक विभागासोबत वाद घातला होता. आता विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून लोकसभा निवडणुकीतीलच बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेचा भत्ता अजून मिळालेला नाही. आता विधानसभेचा भत्ता तरी वेळेवर मिळणार काय, असा सवाल या अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या कामकाजातील मतदान व मतमोजणीचे भत्ते संबंधितांना अदा केले आहेत. फक्त अतिकालिक भत्ता हा दिलेला नाही; कारण यासाठी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरून माहिती जिल्हा निवडणूक विभागाला अद्याप आलेली नाही. ही माहिती आल्यानंतरच याबाबतचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवून भत्त्यासाठी निधीची मंजुरी घेता येऊ शकते.
- सतीश धुमाळ,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी