‘प्रदूषण नियंत्रण’चे अधिकारी फैलावर--पाकीट संस्कृतीवरच ‘प्रदूषण’चे काम

By Admin | Updated: March 13, 2015 23:58 IST2015-03-13T23:49:57+5:302015-03-13T23:58:53+5:30

जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले : एस. एस. डोके यांनी दबाव झुगारून कारवाई करावी; बोटचेपी धोरण सोडण्याचा सल्ला

Officer of 'Pollution Control' spread - Pollution work on 'Pocket Culture' | ‘प्रदूषण नियंत्रण’चे अधिकारी फैलावर--पाकीट संस्कृतीवरच ‘प्रदूषण’चे काम

‘प्रदूषण नियंत्रण’चे अधिकारी फैलावर--पाकीट संस्कृतीवरच ‘प्रदूषण’चे काम

कोल्हापूर : कोणताही उद्योग, कारखाना, प्रकल्प सुरू करताना प्रदूषण नियंत्रण मंडळ ‘ना हरकत’ दाखला देते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दबाव आणि बोटचेपे धोरण झुगारून प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. आपली जबाबदारी टाळून जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट दाखवू नये, अशा शब्दांत जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके यांना सुनावले. आंदोलकांनीही आता प्रदूषण करणाऱ्यांनाही ‘टार्गेट’ करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. पंचगंगा प्रदूषणप्रश्नी स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष बंडू पाटील, जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी माने यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी माने बोलत होते. ते म्हणाले, प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे थेट अधिकार मला नाहीत. मी समन्वयकाची भूमिका बजावू शकतो. प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडावी. ‘प्रदूषण’च्या अधिकाऱ्यांनी दबाव बाजूला ठेवून ठोस कारवाई करावी. प्रदूषणच्या अधिकाऱ्यांनी प्रदूषण करणारे किती कारखाने सील केले? महानगरपालिका, नगरपालिका यांच्यावर काय कारवाई केली? त्यांनी आपले अधिकार परिणामकारकरीत्या वापरण्याची गरज आहे. आंदोलकांनी प्रदूषण करणाऱ्यांविरोधात आवाज उठवावा.
पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासंबंधीच्या बैठकीला मला बोलावू नका. माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्यास संबंधित अधिकारी आपली जबाबदारी झटकून ती माझ्यावर सोपवितात. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बैठक घ्या. प्रदूषण करणारे पोसलेले आहेत. त्यांच्यावर कारवाईवेळी आंदोलकांनी अधिकाऱ्यांना मदत करावी. चंदगड तालुक्यातील एव्हीएच प्रकल्पाला जमीन दिली औद्योगिक विकास मंडळाने; नाहरकत दाखला दिला प्रदूषण नियंत्रण मंडळाने; असे असताना प्रकल्प सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले. कोणीही येऊन ऊठसूट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करायचे, तोडफोड करायची हे बरोबर नाही, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.


आयुक्तांना सूचना
कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना मोबाईलवर संपर्क साधून, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रदूषित पाणी पंचगंगेत मिसळू नये, याची खबरदारी घ्या, अशी सूचना माने यांनी दिली.
पाईपमधून दूषित पाणीपर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांनी साखर काखान्यांमुळे पंचगंगा नदी कशी प्रदूषित होत आहे, याची सविस्तर माहिती दिली. एक कारखाना नदीतून पाणी खेचण्याच्या पाईपमधूनच रसायनमिश्रित दूषित पाणी सोडत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाकीट संस्कृतीवरच ‘प्रदूषण’चे काम
स्वाभिमानी युवा आघाडीचा आरोप : प्रदूषण रोखा, अन्यथा पालकमंत्र्यांनाही फिरू देणार नाही
कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण त्वरित रोखावे, प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा प्रसंगी पालकमंत्र्यांनाही फिरू न देण्याचा इशारा स्वाभिमानी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी येथील प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोरील आंदोलनावेळी दिला. ‘प्रदूषण’चे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके, उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांच्यासमोरच प्रदूषणचे अधिकारी कारवाईपेक्षा ‘पाकिटे’ गोळा करतात, असा लाचखोरीचा थेट आरोप करीत जोरदार निदर्शने केली.
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मंगळवारी स्वतंत्र बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन अधिकारी डोके यांनी दिले होते. बैठक न घेतल्याने संतप्त झालेले पदाधिकारी ‘प्रदूषण नियंत्रण’च्या कार्यालयात घुसून जाब विचारण्याच्या तयारीने कार्यालयाजवळ सकाळी दहा वाजता आले. याची कुणकुण पोलिसांनी लागली. त्यांनी आंदोलकांच्या दुप्पट पोलीस बंदोबस्त लावला.
आंदोलकांनीही आपल्या नियोजनात बदल करून ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, युवा आघाडीचे अध्यक्ष बंडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेटसमोर जोरदार निदर्शने सुरू केली. आंदोलकांंना अधिकारी डोके, होळकर सामोरे गेले. त्यांच्यासमोरच आंदोलकांनी ‘पंचगंगा प्रदूषण’च्या कारभाराचा पंचनामा सुरू केला. प्रदूषणाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याचा निषेध असो, जिल्हा प्रशासनाला धिक्कार असो, अशी घोषणाबाजी केली. गेटसमोरच ठिय्या मारला. बैठकीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात वैभव कांबळे, सुरेश पाटील, शैलेश चौगुले, विश्वास बालिघाटे, सागर चौगुले, आदी सहभागी झाले. आंदोलनादरम्यान पोलीस शंभर आणि आंदोलक पन्नासच्या आसपास असे चित्र होते.


२० रोजी बैठक
पंचगंगा प्रदूषण रोखण्यासंबंधी त्वरित उपाययोजनेसाठी २० रोजी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले. बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त, इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, साखर सहसंचालक, औद्योगिक मंडळाचे अधिकारी, ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


परीट समाजासाठी ‘धोबी घाट’चे दिले आश्वासन
कोल्हापूर : रंकाळा व पंचगंगा घाट येथे परीट समाजास धुणी धुण्यास महापालिका प्रशासनाने मनाई केली आहे. धुणी धुण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी रंकाळा येथील टाकाळा खण, धुण्याची चावी, पंचगंगा घाट, आदी परिसरांची स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी पाहणी शुक्रवारी केली. मुंबई-पुणे येथे असणाऱ्या धोबी घाटाच्या धर्तीवर येथील परीट समाजासाठी धोबी घाटाच्या बांधणीसाठी या बजेटमध्ये आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन फरास यांनी यावेळी परीट समाजाच्या कार्यकर्त्यांना दिले.
रंकाळा व नदीत धुणी धुण्यास परवानगी द्यावी. धुणी धुण्यासाठी पर्यायी सोय महापालिकेने करावी, अशी विनंती करणारे निवेदन कोल्हापूर परीट समाजानेआयुक्त पी. शिवशंकर व स्थायी समितीचे सभापती आदिल फरास यांना दिले होते.
परीट समाजाचा उदरनिर्वाह यावरच अवलंबून आहे. तत्पूर्वी, परीट समाजास रंकाळा व पंचगंगा घाटावर धुणी धुण्यास परवानगी द्यावी, अशी त्या समाजाची मागणी आहे. मात्र, प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने तशी परवानगी देणे शक्य नाही. त्यामुळेच परीट समाजाची मागणी व्यवहार्य असल्याने त्यांना सक्षम पर्यायी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Officer of 'Pollution Control' spread - Pollution work on 'Pocket Culture'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.