ओडिशाचे राजकारण एका व्यक्तीच्या भोवती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:05 AM2019-04-13T01:05:48+5:302019-04-13T01:05:53+5:30

वसंत भोसले देशातील काही राज्यांना गरिबीचा शापच आहे. त्यात ओडिशा राज्याचाही समावेश आहे. प्रचंड खनिज संपत्ती, जंगल आणि डोंगराळ ...

Odisha politics is around a person! | ओडिशाचे राजकारण एका व्यक्तीच्या भोवती!

ओडिशाचे राजकारण एका व्यक्तीच्या भोवती!

googlenewsNext

वसंत भोसले
देशातील काही राज्यांना गरिबीचा शापच आहे. त्यात ओडिशा राज्याचाही समावेश आहे. प्रचंड खनिज संपत्ती, जंगल आणि डोंगराळ प्रदेशात विस्तारित ओडिशामध्ये दारिद्र्य प्रचंड आहे. औद्योगिकीरणाचा अभाव, मागास शेती आणि ग्रामविकासाकडे दुर्लक्ष झाल्याने ओडिशाने प्रगतीची पहाट पाहिलेलीच नाही. या दारिद्र्याच्या समस्येकडे लक्ष न दिल्याने एकेकाळी भारतीय काँग्रेसचा प्रभाव असलेले राज्य पुढे विरोधी पक्षांकडे गेले. तेथे गेली वीस वर्षे काँग्रेस सत्तेबाहेर आहे. पूर्वी या राज्याचे नाव खासगी हवाई क्षेत्रातील वैमानिक विजयानंद ऊर्फ बिजू पटनायक यांच्याशी जोडले गेले होते. त्यांनी दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात रॉयल इंडियन एअर फोर्समध्ये वैमानिक म्हणून काम केले. स्वतंत्र भारतात त्यांनी काँग्रेसच्यामार्फत राष्ट्रीय राजकारणात सहभाग घेतला. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याशी मतभेद झाल्याने ते विरोधी पक्षाची भूमिका बजावू लागले. बिजू पटनायक हीच गेल्या पन्नास वर्षांत ओडिशात काँग्रेसविरोधातील शक्ती म्हणून ओळखली गेली. त्यांच्या निधनानंतर (१७ एप्रिल १९९७) जनता दलातील त्यांच्या ओडिशातील समर्थकांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे चिरंजीव नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली बिजू यांच्या नावानेच जनता दलाची स्थापना करण्यात आली. (२६ डिसेंबर १९९७) तीच ओडिशाची अस्मिता ठरली.
काँग्रेसविरोधात बिजू जनता दलाने प्रथम भाजपशी आघाडी करून १९९८ ची निवडणूक लढविली. राज्यातील २१ पैकी नऊ जागा जिंकल्या. पुढे १९९९ मध्ये दहा जागा जिंकल्या. नवीन पटनायक यांची अस्का मतदारसंघातून लोकसभेवर निवड झाली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे खनिज संपत्ती मंत्रिपद दिले गेले. मार्च २००० मध्ये राज्य विधानसभेची निवडणूक झाली. भाजपशी युती करून त्यांनी ती जिंकली. मग त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला आणि राज्यात मुख्यमंत्री म्हणून गेले. २००४ मध्ये त्यांनी लोकसभेबरोबर निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यातही बहुमत मिळविले. हे यश नवीन पटनायकांना मिळत असले तरी भाजपशी सुप्तपणे राजकीय संघर्ष चालू होता. भाजपला प्रमुख पक्ष होण्याची घाई होती. या राज्यातील काँग्रेस नेतृत्वहीन झाली होती.
अशा अवस्थेत भाजपने बजरंग दलाच्या आडून ख्रिश्चन मिशनरी विरुद्ध हिंसात्मक मार्ग स्वीकारून हल्ले केले. परिणामी २००७ मधील हिंसाचाराने देशभर वादळ उमटले. नवीन पटनायक हे आधुनिक विचारांचे आहेत. त्यांचे बहुतांश वास्तव्य ओडिशाच्या बाहेरच झाल्याने त्यांना ओडिया भाषा येत नाही. हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषा त्यांना उत्तम येतात. ते इंग्रजीमध्ये लिखाण करतात. संगीत ऐकतात. त्यांची जीवनपद्धती ही युरोपीयन आहे. रोमनमध्ये लिहिलेली ओडिया भाषेतील भाषणे ते वाचून दाखवितात.
मात्र, त्यांच्या सरकारच्या अनेक योजना या सर्व समाज घटकांना सामावून घेणाºया आहेत. शहरी भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर, ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्याच्या सुविधा देणे, रस्ते बांधणी, आदी कार्यक्रम त्यांनी प्राधान्याने राबविले. भाजपच्या प्रयत्नांपासून ते सावध होते. ख्रिश्चनांवरील हल्ल्यानंतर त्यांनी भाजपशी आघाडी तोडली आणि २००९ तसेच २०१४ च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या. त्यामध्ये बिजू जनता दलाला प्रचंड यश मिळाले.

Web Title: Odisha politics is around a person!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.