आता लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिक : राही सरनोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 19:29 IST2021-08-04T19:26:25+5:302021-08-04T19:29:47+5:30
Rahi Sarnobat Olympics 2020 kolhapur : महिन्याच्या विश्रांतीनंतर २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीला लागणार असून, नक्कीच देशासाठी पदक जिंकेन, असा निर्धार कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने केला. टोकीओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर प्रथमच घरी परतलेल्या राहीने बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आता लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिक : राही सरनोबत
कोल्हापूर : टोकीओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी झाली. तरीसुद्धा या स्पर्धेतून मला सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या. या अनुभवावरच मी एक महिन्याच्या विश्रांतीनंतर २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीला लागणार असून, नक्कीच देशासाठी पदक जिंकेन, असा निर्धार कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने केला. टोकीओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर प्रथमच घरी परतलेल्या राहीने बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
कोरोना महामारीमुळे स्पर्धा एक वर्षांनी पुढे ढकलल्याने नियोजित वेळापत्रक व तयारीचा आराखडा चुकला. आराखड्यानुसार २०२०मध्ये स्पर्धा झाली असती तरी नक्कीच निकाल वेगळा लागला असता. कोरोना काळातही ही स्पर्धा आम्हाला खेळायला मिळाली. त्यात पाच शॉटस् खराब लागले. त्याचा परिणाम इतक्या वर्षांच्या मेहनतीवर झाला. तरीसुद्धा मी या स्पर्धेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते. हा अनुभव मला नक्कीच २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी उपयोगी पडणार आहे, असा आत्मविश्वास तिने दाखवला. एक महिन्यांच्या विश्रांतीनंतर मी पुन्हा सरावाला सुरुवात करणार आहे.
जर्मन प्रशिक्षकाची कमतरता जाणवली
दोन वर्षांपूर्वी जर्मनीची ऑलिम्पिक सुवर्ण विजेती प्रशिक्षक मुखबयार हिच्यासोबत माझा करार होता. हा करार नेमका टोकीओ ऑलिम्पिक २०२०पर्यंतच होता. त्यानंतर मला समशेरसिंग यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावे लागले. तिच्यामुळेच मी आतापर्यंत विश्व नेमबाजी व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चमकदार कामगिरी केली. तिची उणीव मला टोकीओ ऑलिम्पिक स्पर्धेत जाणवली.
नोकरीपेक्षा खेळाला प्राधान्य
राज्य शासनाने दिलेली नोकरीही महत्त्वाची आहे. पण आगामी काळात पॅरिस ऑलिम्पिक मला महत्त्वाचे वाटते. एकावेळी दोन्हीकडे लक्ष देऊ शकत नाही. राज्य शासनाने मला पाठबळ दिले आहे. तरीसुद्धा मी याबाबतचा अर्ज दिला आहे. मी सरावावर भर देणार असून, येत्या सहा महिन्यांत केवळ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईन, असा अर्ज शासनाकडे सादर करणार आहे.
विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण यशाला वाचनाचा आधार
क्रोएशियामध्ये महिनाभरापूर्वी झालेल्या जागतिक विश्व स्पर्धेत मला सुवर्ण कामगिरी करता आली. त्यात दोन सुवर्ण, एका कांस्य पदकाची कमाई केली. यावेळी वेपन ठेवण्याच्या बॅगेत पु. ल. देशपांडे, सुधा मूर्ती यांची हलकीफुलकी पुस्तके ठेवली होती. ती वाचत होते. मला वाचनामुळे मोठा आधार मिळतो, अशीही प्रांजळ कबुली तिने दिली.