आता लक्ष प्रभाग रचना व आरक्षणाकडे
By Admin | Updated: November 17, 2015 00:44 IST2015-11-17T00:43:57+5:302015-11-17T00:44:47+5:30
जयसिंगपूर नगरपालिका : मतदार नोंदणी अभियानाला प्रतिसाद

आता लक्ष प्रभाग रचना व आरक्षणाकडे
संदीप बावचे-- जयसिंगपूर -मतदान नोंदणी अभियानानंतर आता प्रभाग रचना व आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे. येत्या जून-जुलै २०१६ मध्ये प्रभाग रचना, त्यानंतर आरक्षण सोडत होणार आहे. दीपावलीच्या निमित्ताने अनेक इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटीतून इच्छुक असल्याचे फटाके वाजविले आहेत. येणाऱ्या वर्षभरात जयसिंगपूरचे वातावरण निवडणूकमयच असणार आहे. डिसेंबर २०१६ मध्ये येथील नगरपालिकेची मुदत संपणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शासनाला कार्यक्रम घेणे क्रमप्राप्त आहे. याची तयारी सुरू झाली आहे. लोकसंख्येच्या आराखड्यानुसार तीन स्वीकृत असे एकूण २८ नगरसेवकांची संख्या होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर असा मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अद्ययावतीचे काम शासनाकडून करण्यात आले. यामुळे
नगरपालिका निवडणुकीचा मतदार नोंदणी कार्यक्रमाने बिगुल वाजला आहे.
मतदार नोंदणी कार्यक्रमानंतर आता प्रभाग रचना व आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे. येत्या जून-जुलै महिन्यांमध्ये प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत होणार आहे.
प्रभाग रचना ही शासनाकडून जाहीर होणार असून चिठ्ठी पद्धतीने आरक्षणाची सोडत येथील नगरपालिकेत होणार आहे. नुकत्याच झालेल्या दीपावलीच्या निमित्ताने अनेक इच्छुकांनी प्रभागात गाठीभेटी घेऊन आपण इच्छुक असल्याचे फटाके फोडले आहेत. येणाऱ्या वर्षभराच्या काळात या ना त्या निमित्ताने इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन दिसणार आहे.
अभियान यशस्वी
जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये नवीन मतदार नोंदणी, पत्त्यातील दुरुस्ती, दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे अशी मोहीम राबविण्यात आली. यात एकूण २९०० अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यामुळे हे अभियान यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राज्यात यापुढे ई-इलेक्शन पद्धतीने निवडणुका होण्याचे संकेत आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्याची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आॅनलाईन अर्ज स्वीकारणे, गुगल मॅपवर प्रभाग रचना तयार करणे, प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्यासाठी खास सॉफ्टवेअर, निवडणुकामध्ये अधिकाधिक संगणकीय तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न यापुढे होणार आहे.