आता ‘कॅशियर’ लेस बॅकिंग
By Admin | Updated: December 5, 2014 00:24 IST2014-12-04T23:53:08+5:302014-12-05T00:24:56+5:30
‘किओस्की’ची सुविधा : जलद पैसे भरण्यासाठी बँकांत मशीनपुढे रांगा...!

आता ‘कॅशियर’ लेस बॅकिंग
रमेश पाटील - कसबा बावडा -बँकेत पैसे भरायचे आहेत. गर्दी तर प्रचंड आहे. रांगेत थांबायला वेळ नाही; परंतु आता अशी वेळ ग्राहकांवर येणार नाही. कारण आता बँकांनी ‘कॅश डिपॉझिट किओस्की’ (पैसे स्वीकारणारे मशिन्स) ठिकठिकाणी बसविण्यास सुरुवात केली आहे. हे मशीन कमी वेळेत जलद पैसे स्वीकारून त्याची त्वरित रिसीट देते. शिवाय खात्यावरही त्वरित पैसे जमा करते. तसेच तुमचा रांगेत उभा राहण्याचा वेळही वाचवते. सध्या शहरातील काही मोठ्या निवडक बँकांत ही सुविधा सुरू झाली आहे. कोल्हापुरातही काही बँकांत ही सुविधा आहे.
बँकांनी आपल्या ग्राहकांना ‘एटीएम’ वापरण्याची सक्ती केल्याने बँकांतून चेक अथवा विड्रॉल्सद्वारे पैसे काढणाऱ्यांची संख्या कमी झाली. मात्र, खात्यावर पैसे भरणाऱ्यांची संख्या पूर्वी आहे तशीच किंवा त्याहून जास्त अशीच राहिली आहे. या पैसे भरण्यासाठी गर्दी करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी प्रमाणात व्हावी, तसेच त्यांचा वेळ वाया जाऊ नये, त्यांना रांगेत उभा राहता लागू नये यासाठी ‘किओस्की’ मशीन बसविण्यात येऊ लागल्या आहेत. सुरुवातीला गोंधळून गेलेले ग्राहक आता नित्य नियमाने या मशीनचाच वापर करू लागले आहेत. या मशीनमुळे भविष्यात कॅशियरचे महत्त्व कमी होण्यााची चिन्हे आहेत. किओस्क मशिन वापरण्यास सोपे आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेंपैकी एक भाषा निवडून आपणास ते वापरता येते. एका व्यक्तीला एका दिवशी आपल्या खात्यावर ४० हजार रुपये भरता येतात. त्यापेक्षा जास्त रक्कम हे मशीन स्वीकारू शकत नाही. तसेच एकावेळी कोणत्याही प्रकारच्या केवळ ४० नोटाच हे मशीन स्वीकारते. बनावट नोटा हे मशीन चटकन ओळखते. त्या नोटा बाहेर काढते.
या मशीनमध्ये पाच लाखांपर्यंत नोटा साठविण्याची क्षमता आहे. ज्याठिकाणी ‘ई-गॅलरी’ आहे, अशा ठिकाणी मात्र नोटा साठविण्याची क्षमता १५ लाखांपर्यंत आहे. बँकांचा कॅश टाईम संपेल तेव्हा या मशीनमधील रक्कम काढून घेतली जाते. एखाद्यावेळी मशीनमध्ये क्षमतेपेक्षा जादा रक्कम साठली, तर त्याचा संदेश संबंधित यंत्रणेला आपोआपच दिला जातो.
सध्या कोल्हापूर शहरात आठ ते दहा ठिकाणी अशा मशीन बसविण्यात आल्या आहेत. कमी वेळेत आणि जलद पैसे भरून या मशीनद्वारे घेतले जात असल्यामुळे मशीनमध्येच पैसे भरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे बँकेस कॅशियरच्यासमोर जशी पैसे भरण्यासाठी गर्दी होते, तशीच गर्दी आता या ‘किओस्की’ मशीनच्या पुढे होऊ लागली आहे. त्यामुळे बँकांनी आता एटीएम मशीनप्रमाणे या ‘किओस्की’ मशीनची संख्या वाढवावी, अशी मागणी ग्राहकांतून होऊ लागली आहे.
‘किओस्की’ची संख्या वाढणार
सध्या कॅश डिपॉझिट किओस्कीमध्ये पैसे भरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे भविष्यात अशा किओस्कींची संख्या वाढविण्यात बँका निश्चितच भर देणार आहेत. एटीएम सेंटरप्रमाणे किओस्कीची सेंटरही काही दिवसांनी सर्वत्र दिसतील.
विनयकुमार मिश्रा,
वरिष्ठ प्रबंधक (आय. टी.), बँक आॅफ इंडिया.