कोल्हापूर : विमानाचे लँडिंग करताना अडथळा ठरणाऱ्या विमानतळाजवळील उंच इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून अशा इमारती मालकांना नोटिसा पाठवण्याची तयारी कोल्हापूरविमानतळ प्राधिकरणाने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने भारतीय विमानचालन कायदा २०२४ मध्ये सुधारणा केली आहे. विमानतळाच्या सभोवतालची उंच घरे किंवा झाडे एका विशिष्ट परिघाच्या आत असतील तर ती काढून टाका, असे आदेश नागरी उड्डाण मंत्रालयाने जिल्हाधिकारी व विमानतळ प्राधिकरणाला दिले आहेत.त्याअनुषंगाने कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाने अशा उंच इमारतींवर कारवाई सुरू करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. जर एखादी इमारत अधिकृत असेल पण त्याची उंची जास्त असेल तर त्या इमारतीची उंची कमी केली जाणार आहे. मात्र, पूर्ण इमारतच अनधिकृत असेल तर ती पाडली जाणार आहे.६० दिवसांची मुदतविमानतळ परिघात असणाऱ्या उंच इमारत किंवा झाड मालकाला नोटीस बजावली जाईल. नोटीसचा कालावधी ६० दिवसांचा असेल. या मुदतीत इमारत किंवा झाड मालकाने काढायचे आहे. तसे न केल्यास त्यावर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.इमारत मालकाला मागता येईल दादकोणत्याही घरमालकाला किंवा इमारतीच्या मालकाला विमानतळ प्रभारी अधिकाऱ्याच्या सूचनेबाबत काही तक्रार असल्यास तो प्रथम अपील अधिकारी किंवा द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे त्याविरुद्ध अपील करू शकतो.
विमानतळाजवळील अडथळा ठरणाऱ्या उंच इमारतींवर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. - अनिल शिंदे, संचालक, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण.