नव्या आयुक्तांकडून सोमवारी बैठकीच्या सूचना
By Admin | Updated: January 17, 2015 00:08 IST2015-01-16T23:56:31+5:302015-01-17T00:08:00+5:30
आज स्वीकारणार सूत्रे : अधिकाऱ्यांत खळबळ

नव्या आयुक्तांकडून सोमवारी बैठकीच्या सूचना
कोल्हापूर : महापालिकेचे नूतन आयुक्त पी. शिवशंकर उद्या, शनिवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. मात्र, नवीन आयुक्त प्रत्यक्ष कामास सोमवार (दि. १९)पासून सुरुवात करणार आहेत. तत्पूर्वी सोमवारी महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीचे नियोजन करण्याच्या सूचना आज, शुक्रवारी नूतन आयुक्तांनी संबंधितांना मेलद्वारे दिल्या आहेत. आयुक्तांनी कोल्हापुरात दाखल होण्यापूर्वीच प्रत्यक्ष कामास सुरुवात केल्याने अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी २१ जानेवारीला कर्नाटक स्टाफ सिलेक्शन कमिटीच्या विभागीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यांच्या जागी गडचिरोली येथील सहायक जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची नियुक्ती झाली. उद्या, शनिवारी होणाऱ्या महासभेत तसेच सभेनंतर कर्मचारी व पदाधिकाऱ्यांतर्फे आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर नूतन आयुक्त पदभार स्वीकारणार आहेत. प्रत्यक्ष कामास ते सोमवारपासून सुरुवात करणार आहेत. प्रत्यक्ष कामाच्या पहिल्या दिवशीच नूतन आयुक्तांनी खातेप्रमुखांची आढावा बैठक बोलावली आहे. प्रत्येक खात्याचा आढावा व वस्तुस्थितीची माहिती ते घेणार आहेत. खातेप्रमुखांनी सर्व इत्थंभूत माहितीसह बैठकीला हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर सर्वच विभागांत नूतन आयुक्तांना द्यावयाच्या माहितीचे संकलन करण्याचे काम सुरू होते. कार्यालयात रात्री उशिरापर्यंत धांदल सुरू होती. (प्रतिनिधी)
उद्या सायंकाळपर्यंत कोल्हापुरात येत आहे. सोमवारपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात करू. कोल्हापूर शहर व परिसराबाबत अधिक माहिती नाही. यासाठीच ‘पॉवर प्रझेंटेशन’साठी खातेप्रमुखांनी सर्व माहितीसह बैठकीला येण्याबाबत निरोप दिला आहे. खातेप्रमुखांच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीतून महापालिका व शहराच्या सद्य:स्थितीबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष लाईन आॅफ अॅक्शन ठरविता येईल.
- पी. शिवशंकर
(नूतन महापालिका आयुक्त)