‘दालमिया’ला दूषित पाण्याबद्दल नोटीस
By Admin | Updated: February 20, 2015 23:13 IST2015-02-20T22:00:52+5:302015-02-20T23:13:06+5:30
‘प्रदूषण नियंत्रण’चे वरातीमागून घोडे

‘दालमिया’ला दूषित पाण्याबद्दल नोटीस
पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया शुगर कंपनी) साखर कारखान्याला दूषित पाण्याची अशास्त्रीय पद्धतीने निर्गत होणारी व्यवस्था तत्काळ थांबवा, अन्यथा कारखान्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ताकीद कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसीद्वारे दिली आहे, म्हणजेच वरातीमागून घोडे नाचविण्याचा प्रकार प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत आहे.साखर कारखान्यांना गळीत हंगामापूर्वी प्रदूषण मंडळाचा परवाना मिळाल्याशिवाय हंगाम सुरू करता येत नाही; मग प्रदूषण मंडळाने प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची निर्गत व्यवस्था न पाहताच कंपनीला कारखाना सुरू करण्याची परवनागी दिलीच कशी, हा प्रश्न कारखाना कार्यक्षेत्रातून विचारला जात आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे मळीमिश्रित पाणी साठविण्याचा प्रश्न आहे. लघूनच्या गळतीमुळे हे पाणी ओढ्याद्वारे कासारी नदीत मिसळते. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होते. ही बाब निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली होती. कारखान्याने वन परिक्षेत्राजवळ असणाऱ्या जमिनीत कच्च्या खड्ड्यात दोन ठिकाणी सांडपाणी साठविले असल्याचे आढळून आले. कारखान्याचे प्रक्रिया केलेले दूषित पाणी कच्च्या खड्ड्यात साठवून ते मुरविण्यास प्रदूषण मंडळाचा प्रतिबंध आहे. गत हंगामात प्रदूषण मंडळाने मळीमिश्रित पाणी कासारी नदीत थेट मिसळल्याने कारखाना १५ दिवस बंद ठेवला होता. असा कटू प्रसंग अनुभवला असतानासुद्धा कंपनीने कच्च्या खड्ड्यात सांडपाणी साठविण्याचे धाडस केले.
एखाद्या तक्रारदाराने तक्रार केल्यावरच प्रदूषण मंडळ जागे होणार का? हंगाम सुरू करण्यापूर्वी प्रदूषण मंडळाने कारखान्याच्या प्रक्रिया पाण्याची (दूषित), राखेची मळी, आणि हवा प्रदूषित करणाऱ्या धुराची काय व्यवस्था केली आहे, हे न पाहताच परवाना दिलाच कसा? त्यानंतर तक्रारदारांच्या तक्रारीनंतरच कारखान्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना प्रदूषण मंडळाने दूषित पाण्याची व्यवस्था शास्त्रीय पद्धतीने करावी, अन्यथा कारखान्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तक्रार देऊन मंडळाने वरातीमागून घोडे नाचवून तक्रारदारंची बोळवण केली आहे. (वार्ताहर)
कारखान्याने प्रक्रिया केलेल्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तीन लघून (तळी) बांधली आहेत. तीनपैकी पहिल्या व दुसऱ्या लघूनला गळती असून त्यांचे दूषित पाणी तिसऱ्या लघूनमध्ये तीन ठिकाणी उमाळते. ही बाब प्रदूषण मंडळाच्या निर्दशनास दिनकर चौगुले यांनी आणून दिली. त्यानंतरच कंपनीच्या विरोधात प्रदूषण मंडळाने कारवाईचे पाऊल उचलले. कारखान्यातील मळी मिश्रित पाण्यामुळे नदीपात्रातील मासे मेले. आता माणसे मारणार काय? असा सवाल केला.