रस्ते प्रकल्पाला नाही, नवीन रेखांकनाला आमचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:23 IST2021-04-02T04:23:54+5:302021-04-02T04:23:54+5:30
कोपार्डे : भुये, भुयेवाडी गावातून जाणाऱ्या रस्ते प्रकल्पाला विरोध नाही. पण या दोन गावातून एक-दोन नव्हे तब्बल चार ते ...

रस्ते प्रकल्पाला नाही, नवीन रेखांकनाला आमचा विरोध
कोपार्डे : भुये, भुयेवाडी गावातून जाणाऱ्या रस्ते प्रकल्पाला विरोध नाही. पण या दोन गावातून एक-दोन नव्हे तब्बल चार ते पाच रस्ते प्रकल्प प्रस्तावित आहेत. यामुळे या गावातील शेती व स्थावर मालमत्ता प्रभावित होणार आहे. सर्वसंमतीने मंजूर करण्यात आलेल्या रेखांकनानुसार रस्ते प्रकल्प राबविण्यात आले तर लाख मोलाची पिकाऊ शेती वाचविता येणार आहे. त्यामुळे सरकारने केलेल्या रेखांकनाला आमचा विरोध आहे. अशी भूमिका भुये, भुयेवाडी ग्रामस्थांनी घेतली आहे.
भुये व भुयेवाडी गावातून राज्य मार्ग १९४ हा रस्ता कार्यरत आहे. सध्या प्रस्तावित असलेला रत्नागिरी नागपूर-राष्ट्रीय महामार्ग, रिंग रोड, कोकण रेल्वे, सुंदर जोतिबा विकास योजनेअंतर्गतचा रस्ता या दोन गावांतूनच जात आहेत. या दोन गावातून जाणाऱ्या राज्य मार्ग १९४ चे दोन्ही बाजूने रुंदीकरण करून नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले होते. यामुळे या गावातील पिकाऊ शेती नैसर्गिक जलस्त्रोत असणाऱ्या सहा ते सात विहिरी व कूपनलिका वाचणार आहेत. या शिवाय भूसंपादनात जाणारी घरे, शेती यासाठी द्यावी लागणाऱ्या किमतीतून शासनाचे ३०० ते ४०० कोटी रुपये वाचणार आहेत. मात्र, सध्या जेथून राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन केले आहे त्याची स्थळ पहाणीच केली गेलेली नाही असा आरोप करण्यात येत आहे. यामुळे जोतिबा डोंगरातून वाहणारे नैसर्गिक ओढे, नाले, ओघळ या नैसर्गिक स्त्रोतांचा अथवा त्यांच्या जलनिस्सारणाचा कुठेही उल्लेख व विचार केलेला दिसत नाही.
चौकट
पूर्वीचे रेखांकन बदलून पर्यावरणीय अटींचा भंग
वारणा कोडोली ते वाठार असे नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन होते. ते बदलून केर्ली, भुयेवाडी, भुये, शिये या दाट लोकवस्ती व कसदार पिकाऊ शेतीतून करण्यात आले आहे. हा पट्टा पूररेषेत येत असल्याने पर्यावरणीय अटींचा यात भंग झाल्याचे स्पष्ट होत आहे.
कोट : प्रस्तावित महामार्गाच्या रेखांकनामधे प्रकल्पाचे पर्यावरणीय परिणाम, स्थानिक सुपीक शेतीचा जैवअधिवास आणि भूरुपस्थान तसेच जोतिबा डोंगररांगेतून पंचगंगा नदीस मिळणाऱ्या प्रवाहाची जलनिस्सारण प्रणाली त्यामुळे तयार होणारे पूरप्रणव क्षेत्र तसेच शेकडो हेक्टर बागायती शेतीस उपलब्ध होणारे उपसा व भूजल सिंचन यांना होणारी बाधा याचा कुठेही उल्लेख किंवा अभ्यास अथवा निरीक्षण केल्याचे दिसत नाही.
- प्रा. डॉ. अभिजीत ज पाटील, भूवैज्ञानिक
कोट : शिये ते भुयेवाडी हा भाग भविष्यात होऊ घालणारे शहर आहे. राष्ट्रीय महामार्ग, रिंग रोड, कोकण रेल्वेमार्ग, अंतर्गत होणारे प्रकल्प या सर्वांसाठी या एकाच भागावरती होणारे अन्यायकारक भूमीसंपादन शासनाच्या विविध विभागांमधे समन्वय ठेवल्यास टाळले जाऊ शकते.
सुभद्रा पाटील,
महिला शेतकरी.
कोट : महामार्गाच्या अधिसूचनेवरती शेतकरी व ग्रामस्थ यांनी दिलेल्या लेखी हरकतीबाबत पारदर्शकपणे सुनावणी होणे गरजेचे आहे. महामार्गाला विरोध नाही. नियोजनशून्य प्रकल्प व स्थळ पहाणी न करता केलेल्या रेखांकनास विरोध आहे.
आनंदराव पाटील
प्रगतशील शेतकरी, भुयेवाडी