गुंडांची हद्दपारी नव्हे, प्रवेश बंद
By Admin | Updated: September 7, 2014 23:25 IST2014-09-07T21:47:56+5:302014-09-07T23:25:35+5:30
पोलिसांचा नवीन शब्द : अनेकजण फिरतात मोकाट

गुंडांची हद्दपारी नव्हे, प्रवेश बंद
गणेश शिंदे -कोल्हापूर - गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवाला हिंसेचे गालबोट लागू नये, उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी समाजातील उपद्रवी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस प्रशासनाकडून प्रवेशबंदीची कारवाई केली जाते; पण ही कारवाई कागदावरच राहते. या उत्सव कालावधीत अनेकजण राजरोस शहरात फिरून पोलिसांनाच आव्हान देतात. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई म्हणजे फार्सच असतो, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून उमटत आहेत.
कारवाईची प्रक्रिया रेंगाळतेय...
अवघा एक दिवस सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला उरला असताना पोलीस प्रशासन अनेक गुन्हेगारांवर प्रवेशबंदीची कारवाई करीत आहे. मुळात महसूल विभागानेच यादी देण्यास उशीर केल्याने नागरिकांबरोबर पोलिसांनाही गुन्हेगाराची माहिती वेळेत मिळू शकत नाही. परिणामी, कोणत्या गुन्हेगारावर कारवाई करायची, याबाबत पोलीसच संभ्रमावस्थेत असतात.
हद्दपारीच्या कारवाईमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामध्ये तथ्यही आहे, यासाठी पोलिसांनी कोणतेही राजकीय दडपण न घेता गुन्हेगारांवर ही कारवाई करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांकडून उमटत आहे. (प्रतिनिधी)
अशी असते प्रकिया...
पोलीस हद्दीतील रेकॉर्डवरील (अभिलेख) गुन्हेगारांची (ज्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत, अशांची) यादी पोलीस प्रशासन गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी १५ दिवस संबंधित प्रांत कार्यालयाकडे पाठविते. त्यानंतर प्रांताधिकारी यादीची तपासणी करून संबंधित तहसीलदार यांच्याकडे पाठवितात. तहसीलदार यादीत ज्यांची नावे आहेत, त्यांना नोटीस काढून म्हणणे मांडण्यासाठी बोलावितात. संबंधित गुन्हेगाराने तहसीलदारसमोर म्हणणे मांडावे लागते. योग्य म्हणणे सादर न करणाऱ्यांवर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम (सीआरपीसी) या १४४ (२) यानुसार कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार देतात. ही यादी संबंधित पोलीस ठाण्यांना पाठवितात. त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करतात.