घरकुल बांधकाम सुरू केल्यावर नामंजुरीचा आदेश
By Admin | Updated: July 14, 2014 01:01 IST2014-07-14T00:59:28+5:302014-07-14T01:01:12+5:30
हातकणंगले पंचायत समिती : जिल्हा परिषदेचा अजब कारभार

घरकुल बांधकाम सुरू केल्यावर नामंजुरीचा आदेश
हातकणंगले : तालुक्यातील इंदिरा आवास घरकुल योजनेची ३१९ घरे जिल्हा परिषदेकडून मंजूर करण्यात आली होती. सर्वसाधारण गटातील लाभार्र्थींना पंचायत समितीने काम सुरू करण्याचे आदेश दिले असताना जिल्हा परिषदेकडून मंजुरी संख्या कमी करून २६० लाभार्र्थींना घरे देण्याचा सुधारित आदेश दिल्यामुळे तालुक्यातील जनरल गटातील ५९ लाभार्थी घरांपासून वंचित राहणार असल्याने पंचायत समिती प्रशासनाची कोंडी झाली आहे.
तालुक्यातील ६२ गावांतील ग्रामपंचायतींनी ग्रामसभा बोलावून दारिद्र्यरेषा यादीतील लाभार्थींच्या गुणसंख्येवर, लाभार्र्थींकडे असलेल्या घरबांधणीसाठीच्या पडसर जागेच्या उपलब्धीनुसार ग्रामपंचायतीने गावातील लाभार्थी निवड करून अशा लाभार्र्थींची यादी पंचायत समितीकडे पाठवली होती.
या यादीची छाननी करून पात्र लाभार्थींना घर मंजूर करण्यासाठी ही यादी जिल्हा परिषदेकडे पाठवली होती. पंचायत समितीकडून आलेल्या यादीनुसार तालुक्यातील सर्वसाधारण गटातील ३१९ लाभार्र्थींना घरे मंजूर केल्याचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत समितीकडे पाठविला. जिल्हा परिषदेच्या आदेशाची अंमलबजावणी करत पंचायत समितीने ३१९ लाभार्र्थींना घर बांधकाम करण्याचे आदेश दिले.
५९ लाभार्थींनी पंचायत समितीच्या आदेशानुसार घरकुलाचे काम सुरू केले आहे. घरकुलाचे काम सुरू झाले असताना लाभार्र्थींना कोणत्या प्रकारे घरकुल नामंजूर झाले आहे, हे सांगण्याचे धाडस पंचायत समिती प्रशासनामध्ये नसल्यामुळे पंचायत समिती प्रशासनाची कोंडी झाली आहे. (प्रतिनिधी)