राहिद सय्यद/शरद ननावरे ल्ल लोणंद‘मन एक करी म्हणे जाईन पंढरी, उभा विटेवरी तो पाहीन सावळा’ अशी लाडक्या विठुरायाच्या भेटीची आस मनात धरून पंढरपूरच्या वाटेने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात उत्साहात स्वागत झाले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत नीरा नदीत पादुकांना स्नान घालण्यात आले.वाल्हे येथील मुक्कामानंतर वाल्मीकी ॠषींच्या पावनभूमीचा निरोप घेऊन हा दिंडी सोहळा सातारा जिल्ह्याकडे रवाना झाला. सीमेवरील नीरा नदीच्या पात्रात सव्वादोन वाजता श्रींच्या पादुकांचे अभ्यंगस्नान झाले. त्यानंतर बरोबर अडीच वाजता पालखीचे सातारा जिल्ह्यात उत्साहपूर्ण व भक्तिभावाच्या वातावरणात आगमन झाले. यावेळी आसमंतात ‘माउली-माउली’ असा अखंड नामगजर सुरू होता.सातारा जिल्ह्यावासीयांच्यावतीने पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी सपत्नीक पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी रामास्वामी एन., पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, शिक्षण सभापती संजय देसाई, कृषी सभापती किरण साबळे-पाटील, निर्मलताई पार्लेकर-पाटील, दिलीप येळगावकर, प्रांताधिकारी सूरज वाघमारे, खंडाळ्याच्या सभापती दीपाली साळुंखे, सारिका माने, नितीन भरगुडे-पाटील, रमेश धायगुडे-पाटील, अनिरुद्ध गाढवे, अनिता शेळके उपस्थित होते. पालखी सोहळा नीरा नदीकाठी पोहोचल्यानंतर दुपारी विश्रांतीवेळी दिंडीतील सहभागी वारकऱ्यांनी नदी पात्रात स्नानाचा मनमुराद आनंद लुटला. प्रशासनाने नदीत मुबलक पाणी सोडल्याने वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सोहळ्याचे मालक राजू आरफळकर, सोहळाप्रमुख डॉ. प्रशांत सुरू व विश्वस्त श्यामसुंदर मुळे यांनी प्रथेप्रमाणे माउलींच्या रथाचे जिल्ह्यात मार्गक्रमण केले. जिल्हा प्रशासनाने केवळ एकच स्वागत मंडप उभारल्याने शिस्तबद्धरीत्या पालखीचे स्वागत केले. लोणंदला पालखीचा अडीच दिवसांचा मुक्काम असतो. यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, कर्नाटकातून अनेक दिंड्या व वारकरी माउलीच्या सोहळ्यात सामील होण्यासाठी लोणंदमध्ये दाखल होत होत्या. पालखी सायंकाळी पाचला लोणंदनगरीत दाखल झाली. (प्रतिनिधी)
‘माउलीं’च्या नामजपात पालखी जिल्ह्यात
By admin | Updated: June 28, 2014 00:34 IST