मनपा, खासगी शाळांतील दहा शिक्षकांना पुरस्कार
By Admin | Updated: September 5, 2014 00:34 IST2014-09-05T00:28:15+5:302014-09-05T00:34:50+5:30
शिक्षक दिन : वितरण समारंभाची तारीख दोन दिवसांत जाहीर

मनपा, खासगी शाळांतील दहा शिक्षकांना पुरस्कार
कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्यावतीने आज, गुरुवारी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला महानगरपालिकेच्या पाच, तर खासगी अनुदानित शाळांतील पाच, अशा दहा प्राथमिक शिक्षकांना ‘आदर्श पुरस्कार’ देण्यात येत असल्याची घोषणा शिक्षण मंडळाचे सभापती संजय मोहिते व प्रशासन अधिकारी बी. एम. किल्लेदार यांनी संयुक्तपणे केली. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये पाच महिला शिक्षिकांचा समावेश आहे. दोन दिवसांनी पुरस्कार वितरण समारंभाची तारीख जाहीर केली जाणार आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी प्राथमिक शिक्षण मंडळाने शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले होते. शिक्षकांचे अध्यापन, त्यांनी केलेली शाळाबाह्य कामे, त्यांचे शिक्षण, कामाचा अनुभव अशा निकषांवर दहा शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, असे सांगण्यात आले.
ज्यांना पुरस्कार मिळाले, असे शिक्षक पुढीलप्रमाणे : मनपा शाळा - १) सुभश्री स. वर्णे, संभाजी विद्यामंदिर २) अजितकुमार भी. पाटील, प्रिन्स शिवाजी विद्यालय कसबा बावडा ३) वैशाली अ. पाटील, यशवंतराव चव्हाण विद्यालय लक्षतीर्थ वसाहत ४) जोतिबा प. बामणे, भाऊसो महागावकर विद्यालय ५) रुक्साना उ. पटेल, उर्दू मराठी शाळा सरनाईक वसाहत.
खासगी अनुदानित शाळा - १) संजय म. पाटील, डॉ. श्रीधर सावंत विद्यालय रुईकर कॉलनी २) लालासाहेब म. पाटील, शेलाजी वनाजी संघवी विद्यालय ३) सर्जेराव नि. भोसले, वाय. पी. पोवार विद्यालय ४) रचना अ. नलवडे, वाय. पी. पोवार विद्यालय मुक्त सैनिक वसाहत ५) नंदिनी सु. अमणगीकर, सरस्वती चुनेकर विद्यालय सागरमाळ.
जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ होणार असून, दोन दिवसांत त्याची तारीख निश्चित केली जाणार आहे.