शहरातील ‘नगरोत्थान’चे नो टेन्शन...
By Admin | Updated: August 22, 2014 23:26 IST2014-08-22T23:26:40+5:302014-08-22T23:26:40+5:30
योजना पूर्ण होणारच : केंद्राच्या ‘बंद’ निर्णयाचा फटका नाही; पावसाळ्यानंतर होणार कामाला सुरुवात

शहरातील ‘नगरोत्थान’चे नो टेन्शन...
कोल्हापूर : केंद्र सरकारने नगरोत्थान योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शहरातील ३८.५० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते करण्यासाठी १०८ कोटींच्या निधीला यापूर्वीच मंजुरी मिळाली असल्याने प्रशासनाला काळजी नाही. कोट्यवधींचा निधी खर्चूनही शहरातील रस्ते ‘जैसे थे’ असल्याने वाहनधारकांत कमालीचा संताप असून यामुळे नेते मात्र गॅसवर गेले आहेत. दरम्यान रखडलेल्या रस्त्यांसाठी निविदेला ठेकेदारांनी प्रतिसाद दिला असून, पावसाळ्यानंतर हे रस्त्यांचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती उपशहर अभियंता एम. एम. निर्मळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
साडेतीन वर्षांपूर्वी नगरोत्थान योजनेचा निधी महापालिकेकडे वर्ग होऊनही पाकीट संस्कृती व प्रशासनातील ढिलाईमुळे संपूर्ण योजनाच रखडली. यानंतर मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे करण्यास ठेकेदारांनी असमर्थता दर्शविल्यामुळे शहरातील अकरा रस्त्यांच्या कामांची चार भागांत विभागणी करून काढलेल्या फेरनिविदेलाही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर मुदतवाढ देत पावसाळ्यापूर्वी २५ टक्के काम पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. निधी असूनही ‘काम घेता का काम?’ असे म्हणण्याची वेळ महापालिकेवर आली. आता चौथ्यांदा काढलेल्या निविदेला ठेकेदारांनी प्रतिसाद दिल्याने पावसाळ्यानंतर कामास सुरुवात केली जाणार आहे.
मे २०११ मध्ये मुंबईतील ‘शांतिनाथ रोडवेज’, ‘रेलकॉन’ व ‘यूव्हीबी’ अशा तीन कंपन्यांना ही कामे मिळाली. आॅक्टोबर २०११ पासून पुढे दीड वर्षाची कामे पूर्ण करण्याची मुदत त्यांना देण्यात आली होती. यातील सरासरी ३० टक्के कामे पूर्ण करून ठेकेदारांनी तब्बल २७ कोटी रुपयांची रक्कमही उचलली.
नोटिसा देऊनही त्यांनी कामे पूर्ण करण्यास असमर्थता दाखविली. पहिल्या पावसात रस्त्यावर खड्ड्यांची मालिका तयार झाली. आता सर्व कामे दर्जेदार करून घेत, पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती होऊ नये, याची दक्षता घ्यावी लागेल.
खड्ड्यांची जबाबदारी ठेकेदारांचीच
नगरोत्थानमधील काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मुदत संपण्यापूर्वीच अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांचा सर्व्हे करून ठेकेदाराच्या अडीच कोटींच्या अनामत रकमेतून या रस्त्यांची डागडुजी केली जाणार आहे. पावसाळ्यानंतर सर्व कामे सुरू होतील.
- एम. एम. निर्मळे, उपशहर अभियंता
नगरोत्थानमधील रस्ते
यल्लमा मंदिर ते कंदलगाव नाका, इराणी क्रशर खण ते अंबाई टँक, दत्त मंगल कार्यालय, टिंबर मार्के ट कमान ते राजाराम चौकमार्गे जुना वाशी नाका, एनसीसी आॅफिस ते कॉमर्स कॉलेज हॉस्टेल महादेव मंदिर, जमदग्नी ऋषी ते नेहरूनगर आयसोलेशन, हॉकी स्टेडियम चौक ते रामानंदनगर, पाचगाव; जगतापनगर-पाचगाव ते जरगनगर, एसएससी बोर्ड ते राजेंद्रनगर, नार्वेकर मार्के ट ते रेड्याची टक्करमार्गे सुभाषनगर, शाहूपुरी पाचवी गल्ली ते व्यापारी पेठ रोड, राजारामपुरी मेन रोड - जनता बाजार ते मारुती मंदिर, एनसीसी आॅफिस ते मालती अपार्टमेंट, सिद्धार्थनगर मुख्य रस्ता ते स्मशानभूमी, रंकाळा स्टँड ते दुधाळी, शिंगणापूर नाका, शिंगणापूर नाका ते नलिनी बझार, राजीव गांधी पुतळा ते परीख पूल, व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, महाराणा प्रताप चौक ते महापालिका, सेनापती बापट मार्ग ते विद्यापीठ रोड, मार्के ट यार्ड ते जाधववाडी, शिरोली नाका मार्के ट यार्ड कंपौड ते लोणार वसाहत, वायचळ पथ - रुईकर कॉलनी ते लिशां हॉटेल, टेंबलाई रेल्वे गेट ते लोणार वसाहत, सेंट्रल बिल्डिंग ते लाईन बाजार भगवा चौक, राम सोसायटी ते डी. वाय. पाटील बंगला, भगवा चौक रेणुका मंदिर ते कागलवाडी, महावीर कॉलेज चौक ते न्यू पॅलेस नाईक मळा, रुईकर कॉलनी टॉवर ते महाडिक माळ दत्तमंदिर, महाडिक माळ दत्तमंदिरासमोरील रस्ता, दानत हॉटेल मुख्य रस्ता.