कोल्हापूर : पुणे विभागीय जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरसह सर्व जिल्ह्यांकडून वाढीव निधीची मागणी आहे, त्यासाठी भरीव निधीची तरतूद करू असे सांगत, निधीची आकडेवारी जाहीर करणे मात्र टाळले. युनेस्कोच्या यादीतील नामांकनासाठी निवडलेल्या पन्हाळा किल्ला विकासासाठी ५० कोटी व शाळेच्या भौतिक सुविधासाठी विशेष बाब म्हणून ३० कोटींचा निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले.लाडकी बहीण योजनेचा आर्थिक ताण असल्याने वाढीव निधीस मंजुरी दिली नसल्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्याने वाढीव ४२१ कोटींची मागणी केली. प्रत्यक्षात दोन कामांना ८० कोटीच तूर्त तरी जाहीर केले आहेत.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२५-२६ चा पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी बैठक झाली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, आदी उपस्थित होते.मंत्री अजित पवार म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ३६ जिल्ह्यांमध्ये १८ हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला होता. या वर्षी हा निधी वाढवून २० हजार कोटी केला जाईल. वाढीव निधीच्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वाढवून देण्यात येईल. फेब्रुवारीअखेर ८० टक्के व मार्चअखेर पूर्ण निधी दिला जाईल. वायफळ कामांवर खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी.सहपालकमंत्री मिसाळ यांनी जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात महिलांसाठी शौचालयाचे बांधावीत, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी येडगे यांनी जिल्ह्यात शाळेत भौतिक सुविधा, १९५८ सौरशाळा, मुलांकरिता नवीन शौचालय व जुन्या शौचालयाची दुरुस्ती, आरोग्य केंद्रात भौतिक सुविधा, समृद्ध अंगणवाडी केंद्र, मंडळ तेथे ग्रंथालय, राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन व विश्रामगृह नूतनीकरण, मेन राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतनीकरणाची कामे करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.
दृष्टिक्षेपात आराखडा
- कोल्हापूर जिल्ह्याचा सन २०२५-२६ चा वार्षिक आराखडा : ५१८ कोटी ५६ लाख
- अतिरिक्त मागणी : ४२१ कोटी ४७ लाख
- पन्हाळा किल्ला विकास : ८० कोटी देणार
- शाळा सुधारसाठी : ३० कोटी देणार
अजितदादा म्हणतात हे करा..
- भुदरगड किल्ल्यावर स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करा.
- कोल्हापूर महापालिकेने स्वइमारतीच्या देखभाल-दुरुस्तीकरिता उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत.
- रंकाळा तलावात दूषित पाणी जाणार नाही, याची काळजी घ्या.
हद्दवाढ करा; पण कुणी..?कोल्हापूर महापालिकेने हद्दवाढीची कार्यवाही करावी अशी सूचना या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली; परंतु ही हद्दवाढ कुणी करायची हे मात्र त्यांनी सांगितले नाही.