कोणाचंही सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं कधीच नसते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST2020-12-15T04:39:24+5:302020-12-15T04:39:24+5:30
मुरगूड : राज्यातील ग्रामीण भाग विकसित होण्यासाठी ज्यावर गावगाडा अवलंबून आहे त्या शेतकऱ्यांचा विकास महत्त्वाचा आहे; पण देशात शेती ...

कोणाचंही सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं कधीच नसते
मुरगूड : राज्यातील ग्रामीण भाग विकसित होण्यासाठी ज्यावर गावगाडा अवलंबून आहे त्या शेतकऱ्यांचा विकास महत्त्वाचा आहे; पण देशात शेती करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने कोणाचंही सरकार या मूठभर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही. पाच कोटी शेतकऱ्यांपेक्षा त्यांना १२५ कोटी जनता महत्त्वाची वाटते, असे उद्गार पाटोदा आदर्श ग्रामपंचायतीचे सरपंच, व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांनी काढले.
मुरगूड (ता. कागल ) येथे स्वराज्य निर्माण संस्था अवचितवाडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘आपला गाव .. आपला विकास’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लक्ष्य करियर अकॅडमीचे लक्ष्मीकांत हांडे होते. यावेळी स्वराज्य शिक्षक संघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तुकाराम पाटील, उद्योजक संघ कागलचे उपाध्यक्ष विशाल कुंभार, मुरगूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, कोजिमाशिचे संचालक एच. आर. पाटील यांचीही मनोगते झाली. स्वराज्य निर्माण संस्थेचे संस्थापक संदीप बोटे यांनी स्वागत केले.
कोरोना महामारीच्या काळात कागल तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींच्या सरपंच व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाबाबत सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तालुक्यातील ११४ महिलांना या कार्यक्रमात गौरविले. सुभाष भोसले यांनी प्रास्ताविक केले. आकाशवाणी निवेदक विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
१४ मुरगुड
मुरगूड येथे स्वराज्य निर्माण संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार भास्करराव पेरे-पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संदीप बोटे, एच. आर. पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.