ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय निवडणुका नाही : ग्रामविकास मंत्री मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 16:14 IST2021-12-11T16:07:12+5:302021-12-11T16:14:39+5:30
महाविकास आघाडी ओबीसींच्या पाठीशी ठामपणे राहिली आहे तरीही विरोधक ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीला टार्गेट करत असल्याचा केला आरोप.

ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय निवडणुका नाही : ग्रामविकास मंत्री मुश्रीफ
इचलकरंजी : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय राज्यात निवडणुका होणे अशक्य आहे. त्यामुळे आणखीन काही महिने निवडणुका पुढे जातील. महाविकास आघाडी ओबीसींच्या पाठीशी ठामपणे राहिली आहे तरीही विरोधक ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीला टार्गेट करत आहेत, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
इचलकरंजी व शहापूर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील व माजी खासदार निवेदिता माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुश्रीफ म्हणाले, इम्पेरिकल डाटा दिल्याशिवाय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा डाटा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी चार-पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो परंतु तोपर्यंत निवडणुका झाल्यास ओबीसींवर अन्याय होईल म्हणून तसे होऊ देणार नाही. ज्या नगरपालिकांच्या मुदती संपल्या आहेत, तेथे प्रशासक नियुक्त केला जाईल, असेही स्पष्ट केले. स्थानिक राजकारणावर बोलताना पालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला सत्ता दिल्यास शहरातील विकासकामांना बळ देऊन इचलकरंजी देशाच्या नकाशावर झळकेल, अशी कामगिरी करू, असे सांगितले.
मंत्री पाटील यांनी, इचलकरंजी शहरात गेल्या २५ वर्षांत काँग्रेसने केलेल्या विकासामुळे शहर डौलदारपणे उभे आहे. पुढील काळातही शासनाकडून निधी आणून शहराला दिला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, मदन कारंडे, रवींद्र माने, सागर चाळके, उदयसिंह पाटील, आदी उपस्थित होते.
यंत्रमाग व्यवसायासाठीची आश्वासने
बांधकाम कामगारांप्रमाणे यंत्रमाग कामगारांना महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत तसेच २७ अश्वशक्तीपेक्षा खाली असलेल्या यंत्रमाग वीजग्राहकांना ७५ पैशांची सवलत लागू करण्याचे आश्वासन दिले.