ना ड्रेनेजलाईन, ना ले-आउट; सेवांची वानवा

By Admin | Updated: January 19, 2015 00:31 IST2015-01-19T00:10:01+5:302015-01-19T00:31:39+5:30

विकासाची प्रतीक्षा : वाढत्या शहरीकरणामुळे पायाभूत सुविधांची कमतरता; २० लाख लिटरचा जलकुंभ कुचकामी

No drainage line, no le-out; Service providers | ना ड्रेनेजलाईन, ना ले-आउट; सेवांची वानवा

ना ड्रेनेजलाईन, ना ले-आउट; सेवांची वानवा

कोल्हापूर : भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठा विस्तारित, ८५ कॉलन्यांमध्ये विभागलेला, धनगर समाज वसाहतीचे प्राबल्य असणारा आणि मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला अविकसित प्रभाग म्हणजे प्रभाग ६९, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर.
उंच-सखल भौगोलिक रचना, विखुरलेली लोकवस्ती आणि वाढती वस्ती यामुळे प्रत्येक ठिकाणी मूलभूत सुविधा पुरविताना लोकप्रतिनिधीस नागरिकांचा रोष पत्कारावा लागत आहे.
काही वर्षांपूर्वी जमिनीचे दर कमी असल्याने धनगर व कष्टकरी वर्गाने येथे बस्तान बसविले. उच्चभू्र वस्तीचा अभाव हे या प्रभागाचे वैशिष्ट्य. बोंद्रेनगर धनगर वसाहत, तामजाईनगर, नृसिंह कॉलनी, वासुदेवनगर, श्रीकृष्ण कॉलनी या पाच मोठ्या धनगर समाजाच्या अविकसित वसाहती येथे आहेत, ज्यांचे निवडणुकीवेळी निर्णायक मतदान उमेदवारास विजयी करू शकते.
प्रभागाची मुख्य समस्या म्हणजे मुख्य रस्ता. आपटेनगर ते फुलेवाडी रिंगरोड नगरोत्थान योजनेतील रस्ता, ज्यास पाच वर्षे झाली डांबर लागले नाही. रस्त्यावर पसरलेली खडी सुमार दर्जाची, पॅचवर्क नित्याचे, अपघात कायमचे. कॉलनी अंतर्गत रस्ते अविकसित, ज्यामुळे नागरिकांचा पावसाळा जिवघेणा होतो.
प्रभागाचा ले-आउटच नाही. त्यामुळे अस्ताव्यस्तपणे निवासी इमारती वाढत आहेत. संपूर्ण प्रभागास स्वतंत्र ड्रेनेज लाईन नाही. परिणामी सांडपाण्याच्या निर्गतीकरणासाठी गटारीच नसल्याने सांडपाणी कोठेही सखल भागात साचून राहत आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
मुख्य रस्त्यावर पथदिवे नाहीत, मग अंतर्गत कॉलन्यांत पथदिवे येणार कोठून? प्रभागात अंधाराचेच साम्राज्य. कचराकुंड्याच नाहीत, विखुरलेल्या कचऱ्याचा उठाव होणार कसा?
प्रभागात कोल्हापूर शहर वाढीव न. ना. पु. योजनेअंतर्गत २० लाख लिटर्स क्षमतेचा फुलेवाडी जलकुंभ उभारण्यात आला; पण आजही पाणी ना टाकीत, ना प्रभागात. अंतर्गत कॉलन्यांत पाणी येण्याच्या अनियमित वेळेने नागरिक त्रस्त. प्रभागात वीज, पाणी बिल भरणा केंद्र, मंडई, व्यापारी संकुल, प्रशस्त हॉस्पिटल, बाजारपेठा, हॉटेल्स, बगीचे, उद्याने, व्यायामशाळा यांची वानवा आहे. अविकसित प्रभागाने नागरिकांच्या माथी वनवास आला आहे.


नगरोत्थान योजनेंतर्गत रिंगरोड रस्त्यासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले असून, जानेवारीअखेर काम पूर्ण होणार. अंतर्गत रस्ते, गटर्स, पथदिवे, कचरा उठाव, आदी विकासकामांवर कोटीवर रक्कम खर्च. महिपतराव बोंद्रे फौंडेशनतर्फे मोफत रुग्णवाहिका सुरू. वार्षिक आठ लाख निधीत एका कॉलनीचा विकास होत नाही, संपूर्ण प्रभागाचा दूरच.
- इंद्रजित बोंद्रे, विद्यमान नगरसेवक

Web Title: No drainage line, no le-out; Service providers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.