प्रकल्प खर्चात महापालिका ‘फेल’
By Admin | Updated: January 19, 2015 00:50 IST2015-01-19T00:39:09+5:302015-01-19T00:50:35+5:30
नोव्हेंबरअखेर ७३७ पैकी १२६ कोटी खर्च : सल्लागार कंपनीसह प्रशासकीय व राजकीय दुबळेपणाचा परिणाम

प्रकल्प खर्चात महापालिका ‘फेल’
संतोष पाटील - कोल्हापूर -पंचगंगा प्रदूषण, सुजल अभियान, दुधाळी व कसबा बावडा एसटीपी, नगरोत्थान, पावसाळी पाणी नियोजनासह पाईपलाईन योजनेसाठी २००८ पासून २०१४ पर्यंत महापालिकेला तब्बल ७३७ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मिळाला. मात्र, प्रत्यक्षात १२६ कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात प्रशासनाला यश आले. सल्लागार कंपनीसह प्रशासकीय व राजकीय दुबळेपणामुळेच प्रकल्प रखडल्याचे चित्र आहे.२०१४-१५ च्या अंदाजपत्रकात पंचगंगा प्रदूषण, नगरोत्थान योजना, स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट, केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण, कळंबा तलाव सुशोभीकरण, आदी २२३ कोटींच्या प्रकल्पासाठी १५० कोटी खर्चाचे उद्दिष्ट ठेवले. मात्र, प्रत्यक्षात डिसेंबरअखेर ७३ कोटी रुपयेच खर्च झाले. साडेतीन वर्षांपूर्वी नगरोत्थान योजनेतून तीन वर्षांपूर्वी १०८ कोटींचा निधी मिळाला. पैकी ९० टक्के निधी खर्च होणे अपेक्षित असताना ३० कोटीच खर्च करण्यात यश आले. स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटचा निधी दोन वर्षे रेंगाळला. ७५ कोटींतील ६० कोटी खर्च उद्दिष्टापैकी फक्त २८ कोटीच निधी खर्ची पडला. दुधाळी एस.टी.पी.साठी १० जून २०११ रोजी आलेल्या २६ कोटी ६१ लाख निधीपैकी फक्त २६ लाख रुपये खर्ची पडले; तर बावडा एस.टी.पी.च्या ७५ कोटी ५८ लाखांपैकी बहुतांश निधी खर्ची पडूनही प्रकल्प पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, याचा प्रश्न आहे.
भोसले नाट्यगृहाचे १० कोटींचे काम सुरू आहे. मात्र, कळंबा तलावासाठीच्या आठ कोटी निधीस हातही लागलेला नाही. आता दोन महिन्यांत दर्जेदार रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे दिव्य प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे. पंचगंगेचे प्रदूषण या ऐरणीच्या प्रश्नावर पालिका प्रशासन उदासीनच आहे.
थेट पाईपलाईनसाठी केंद्र व राज्याकडून आलेल्या १७० कोटी रुपयांपैकी फक्त ९९ लाख २८ हजार रुपयेच खर्च झाले. विविध परवानगींच्या तिढ्यात अडकल्यानेच पाईपलाईनचे पैसे पडून आहेत.
प्रकल्प व खर्चाचा तपशील
प्रकल्पनिधी मंजूर दिनांकनिधी रक्कमप्रत्यक्ष खर्च
रंकाळा तलाव संवर्धन१३/८/२००८१२.१० कोटी१०.९२ कोटी
सुजल निर्मल अभियान२३/०३/२०१०१५.९२ कोटी१४.४८ कोटी
पंचगंगा प्रदूषण मुक्ती१६/११/२००९७४.२९ कोटी४१.६९ कोटी
दुधाळी एसटीपी१०/६/२०११२६.६१ कोटी००.२६ कोटी
नगरोत्थान (रस्ते प्रकल्प)१०/६/२०१११०८ कोटी२९.९० कोटी
स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट0३/४/२०१२७५.५८ कोटी२८.३६ कोटी
भोसले नाट्यगृह नूतनीकरण0३/६/२०१११० कोटी५ कोटी (अंदाजे)
क ळंबा परिसर सुशोभीकरण0१/७/२०१२0८ कोटी—
निधी खर्च करण्यासाठी दोन ते पाच वर्षांची मुदत असते. डिसेंबर ते फेबु्रवारी या चार महिन्यांत १०० कोटींपेक्षा अधिकचा खर्च पडणार आहे. त्याची बिले येणे सुरू असून मार्चपर्यंत अधिकाधिक निधी खर्च करण्याचा प्रयत्न आहे.
- संजय सरनाईक,
मुख्य लेखाधिकारी, महापालिका
पालिका मालामाल
गेल्या तीन वर्षांत महापालिकेला ठेवींच्या व्याजाच्या रूपाने मोठी रक्कम मिळाली आहे. मागील वर्षी सव्वादोन कोटी रुपये व्याजातून मिळाले. यावर्षी किमान चार कोटी रुपये मिळणार आहेत. प्रकल्प रखडले असले तरी महापालिका मात्र व्याजामुळे मालामाल होत आहे.