ट्रॅक्स उलटून नवदाम्पत्यासह नऊ जखमी
By Admin | Updated: May 5, 2015 01:14 IST2015-05-05T01:14:27+5:302015-05-05T01:14:27+5:30
रेडेडोहाजवळ अपघात : जखमी सोलापूरजवळील तिट्याळचे

ट्रॅक्स उलटून नवदाम्पत्यासह नऊ जखमी
वडणगे : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी (ता. करवीर) येथील रेडेडोहाजवळ सोलापूरहून जोतिबाला वावरजत्रेला निघालेल्या भाविकांच्या ट्रॅक्सला अपघात झाला. रस्त्याच्या कामासाठी टाकलेल्या मुरुमामुळे ट्रॅक्स उलटून हा अपघात झाला. या अपघातात नवदाम्पत्यासह नऊजण जखमी झाले. सोमवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली असून, करवीर पोलिसांत याची नोंद झाली आहे.
गाडीचे चालक शहाजी पिराजी वावरे, भीमराव विठोबा चोपडे, सोनाक्षी शशिकांत पांढरे हे तिघेजण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. भाग्यश्री पांढरे, गणेश चोपडे, पूजा चोपडे, साक्षी काळे, संदीप वायकुळे, उषा पांढरे हे किरकोळ जखमी झाले आहेत. अधिक माहिती अशी, दक्षिण सोलापूर येथील तिट्याळ गावातील भीमराव विठोबा चोपडे हे दुर्योधन व गणेश या नवदाम्पत्यासह नातेवाईक व इतर लोकांना घेऊन जोतिबा दर्शनासाठी निघाले होते. त्यांनी पहाटे चिंचली मायक्का येथे दर्शन घेतले. त्यानंतर जोतिबा दर्शनासाठी निघाले असता कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर रेडेडोहाजवळ रस्त्याच्या साईड पट्ट्यांच्या कामासाठी टाकलेल्या मुरुमाच्या ढिगाऱ्यावर गाडीचे चाक गेल्याने ५० फूट खोल ट्रॅक्स उलटली. (वार्ताहर)