लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : चालू हंगामात ऊसतोडणीच्या नावाखाली शेतकऱ्यांची होत असलेली लूट, लुबाडणूक व अडवणूक या ज्वलंत प्रश्नांवर ‘लोकमत’ने लेखन करून संबंधित घटकांना जागे केले आहे. यावर अधिक लक्ष द्यावे, सुधारणा कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. याबद्दल शेतकरी ‘लोकमत’चे कौतुक करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जावी यासाठी लोकमतच्या बातमीची कात्रणे गावात लावली आहेत, अशी माहिती नरंदे येथील शेतकऱ्यांनी दिली.
‘खंडणी की खुशाली’ या मालिकेत अनुक्रमे ‘एकरी पाच हजार देणार, तरच ऊस तोडणार’ व ‘एकाच ट्रॅक्टरचे तीन करार, शेतकरी गपगार’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले. या वास्तव प्रश्नांची मांडणी वाचकांना अधिक भावली. त्यामुळे नरंदे (ता. हातकणंगले) येथील शेतकऱ्यांनी ही कात्रणे लावली. नरंदे येथील नरंदे विकास सेवा संस्थेच्या फलकावर ही कात्रणे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लावली.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य शीतल कांबळे, दिलीप वळीवडे, प्रवीण कुरणे, सतीश देसाई, सागर नंदीवाले, वैभव भोरे उपस्थित होते.