रेडीरेकनरचे नवे दर एप्रिलपासून लागू
By Admin | Updated: January 2, 2016 08:28 IST2016-01-01T22:04:29+5:302016-01-02T08:28:49+5:30
नियमांत बदल : व्यावसायिकांना दिलासा

रेडीरेकनरचे नवे दर एप्रिलपासून लागू
कोल्हापूर : मिळकतीचे बाजारमूल्य (रेडीरेकनर) निश्चित करण्याच्या नियमांत बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार रेडीरेकनरचे नवे दर दि. १ एप्रिल २०१६ पासून लागू केले जाणार आहेत. नियमांतील या बदलामुळे सध्याचे रेडीरेकनरचे दर ३१ मार्च २०१६ पर्यंत कायम राहणार आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक, नव्याने स्थावर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.दरवर्षी ३१ डिसेंबरला राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांकडून राज्याचा नवा रेडीरेकनरचा तक्ता जाहीर केला जातो. नव्या वर्षामध्ये रेडीरेकनरचे दर साधारणत: ९ ते १६ टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव होता. मात्र, राज्य सरकारने दरवाढीचा प्रस्ताव नामंजूर केला; शिवाय दर न वाढविण्याचा निर्णय घेतला. बांधकाम व्यवसायात आधीच मंदी असल्याने पुन्हा रेडीरेकनरचे दर वाढवू नयेत, अशी मागणी राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांनी सरकारकडे केली होती. मात्र, दरवाढ न करण्याच्या निर्णयाची सूचना अथवा आदेश जिल्हा मुद्रांक कार्यालयाला बुधवार (दि. ३० डिसेंबर) पर्यंत मिळालेल्या नव्हत्या. त्यामुळे दर वाढणार की, ‘जैसे थे’ राहणार, याबाबत संभ्रमावस्था होती. बांधकाम व्यावसायिक आणि स्थावर मालमत्ता खरेदीच्या प्रतीक्षेतील नागरिकांना रेडीरेकनरचे दर जाहीर होण्याची गुरुवारी प्रतीक्षा लागून राहिली होती. सायंकाळी पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाकडून दि. १ एप्रिलपासून रेडीरेकनरचे नवे दर लागू केले ज्
ाातील, असे जाहीर करण्यात आले.
रेडीरेकनरचे नवे दर एक एप्रिलपासून जाहीर करावेत, ही बऱ्याच वर्षांपासूनची बांधकाम व्यावसायिकांची मागणी होती. आता ती पूर्ण झाली आहे. बांधकाम व्यावसायिकांचे आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू होत असल्याने नियमांतील बदल उपयुक्त ठरणारा आहे. मात्र, एप्रिलला नवे दर जाहीर करण्याचा नियम यापुढेही कायम राहावा, इतकी अपेक्षा आहे.
- महेश यादव, अध्यक्ष,
क्रिडाई कोल्हापूर