नवीन ‘जीएसटी भवन’ कोल्हापूरची वेगळी ओळख ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:21 IST2021-01-22T04:21:11+5:302021-01-22T04:21:11+5:30

कोल्हापूर : करसंचयनाचे काम करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या कार्यालयीन इमारतीची गरज असते. ते लक्षात घेऊन साकारण्यात येणारे नवीन ‘जीएसटी ...

The new 'GST Bhavan' will be a different identity of Kolhapur | नवीन ‘जीएसटी भवन’ कोल्हापूरची वेगळी ओळख ठरेल

नवीन ‘जीएसटी भवन’ कोल्हापूरची वेगळी ओळख ठरेल

कोल्हापूर : करसंचयनाचे काम करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या कार्यालयीन इमारतीची गरज असते. ते लक्षात घेऊन साकारण्यात येणारे नवीन ‘जीएसटी भवन’ कोल्हापूरची वेगळी ओळख ठरणार आहे. उत्तम कार्यालयीन इमारत ही त्या विभागाची ओळख असते. अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या कार्यालयीन सुविधा मिळाल्यास करसंचयन जास्तीत जास्त होऊन त्याचा देशबांधणीसाठी उपयोग होईल, असे प्रतिपादन केंद्रीय वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाच्या पुणे क्षेत्राच्या मुख्य आयुक्त कृष्णा मिश्रा यांनी गुरूवारी केले.

येथील ताराबाई पार्कमध्ये जीएसटीच्या कोल्हापूर आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय लोकनिर्माणच्या गोवा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीणकुमार अग्रवाल प्रमुख उपस्थित होते. केंद्रीय जीएसटीच्या कोल्हापूर विभागाच्या चांगल्या ठिकाणी जागा, इमारती आहेत. त्यांचे विभागीय सहाय्यक आयुक्तांनी उत्तम प्रकारे संवर्धन, विकास करावा. नवीन जीएसटी भवन नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे, असे कृष्णा मिश्रा यांनी सांगितले. नवीन जीएसटी भवन हे हरित तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणपूरक पध्दतीने साकारले जाईल. आयुक्तालयाच्या जुन्या वास्तूचे सौंदर्य कायम ठेवण्यात येईल. या भवनाचे काम २१ महिन्यांत पूर्ण केले जाणार असल्याचे प्रवीणकुमार अग्रवाल यांनी सांगितले.

या कार्यक्रमास केंद्रीय जीएसटीच्या पुणे क्षेत्राचे आयुक्त राजीव कपूर, दिलीप गोयल, व्ही. सौंदरराजन, मिहीर रंजन, संयुक्त आयुक्त पराग सिंग, कोल्हापूर ‌विभागाचे संयुक्त आयुक्त राहुल गावंडे यांच्यासह अधीक्षक, सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. केंद्रीय जीएसटीच्या कोल्हापूर विभागाचे आयुक्त व्ही. एन. थेटे यांनी प्रास्ताविक केले. संयुक्त आयुक्त वैशाली पतंगे यांनी आभार मानले.

चौकट

अद्ययावत इमारत साकारणार

केंद्रीय जीएसटीचे सध्या कोल्हापूरमध्ये बागल चौक, न्यू शाहूपुरी येथे भाडेतत्वावरील इमारतींमधील कार्यालयांमध्ये काम चालते. ही कार्यालये एकत्रित करण्याच्या उद्देशाने नवीन जीएसटी भवन उभारण्यात येत आहे. ताराबाई पार्कमधील सध्याच्या आयुक्तालयाच्या परिसरातील ३० हजार स्क्वेअर फूट जागेत सात मजली आणि अद्ययावत सुविधा असणारी इमारत साकारली जाणार आहे. त्यासाठी ४३ कोटी रुपये खर्च येणार आहे.

चौकट

करसंचलनाबाबत आयुक्तांची बैठक

या कार्यक्रमानंतर करसंचलनाबाबत पुणे क्षेत्रातील आठ आयुक्तांची मुख्य आयुक्त मिश्रा यांनी बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी तांत्रिक स्वरुपातील काही सूचना केल्या आहेत.

Web Title: The new 'GST Bhavan' will be a different identity of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.