कोल्हापूर : आता कोरोना संपला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडीही वेगाने घडणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षातही नवे सरकार येऊ शकते, असं सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्तांतराचा आणखी एक नवा वायदा सोमवारी येथे जाहीर केला.कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, आता राज्यात सरकार येण्याचा काळ हा महिन्याचा नसेल, तर दिवसांचा असेल. इंग्रजी नववर्ष १ जानेवारीला, तर हिंदू नववर्ष गुढी पाडव्याला सुरू होते. पण चांगल्या कामाला लवकरचा मुहूर्त धरावा म्हणतात. अमरावती येथील दंगलीमध्ये जर भाजपचा हात असेल, तर तुम्ही काय झोपा काढता काय?, असा सवाल पाटील यांनी नाना पटोले यांना विचारला आहे. या दंगलीच्या पहिल्यादिवशी कोणाचा हात हाेता, याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली. राजीव सातव यांच्या पत्नीला दिलेल्या विधानपरिषदेच्या उमेदवारीचे पाटील यांनी यावेळी स्वागत केले.एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेण्यात अडचणी असल्या, तरी त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या सेवा-सुविधा दिल्या जातात त्या देण्यात कोणती अडचण आहे, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.
नव्या वर्षात सत्तांतर, राज्यात लवकरच नवे सरकार येणार; चंद्रकांत पाटलांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 13:55 IST