दीपक मेटील).
सडोली (खालसा) : गेले तीन वर्षांपासून सुरू असणाऱ्या कोल्हापूर-राधानगरी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात मोऱ्या व पुलाची कामे अर्धवट ठेवून ठेकेदाराने इतर कामांसाठी रस्ता खुदाई सुरू केली आहे. परिणामी, अर्धवट राहिलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अशक्य असून, कोल्हापूर-राधानगरी मार्ग पुन्हा एकदा पावसाळ्यात अडचणीचा बनणार आहे. गेले तीन वर्षांपासून कोल्हापूर-परिते-गडहिंग्लज या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामाच्या सुरुवातीपासून संबंधित ठेकेदाराने कासवगतीने काम सुरू ठेवल्याने अनेकवेळा या कामासाठी आंदोलन झाली हाेती. या कामासाठी कोल्हापूर-परिते पुईखडी ते परिते दरम्यान असणाऱ्या मोऱ्या, जुने पूल व इतर कामांसाठी अनेक ठिकाणी रस्ता खुदाई करून ठेवली आहे. ती अर्धवट कामे अद्यापही पूर्ण केली नाहीत. यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत वाट शोधावी लागत आहे. या अर्धवट कामामुळे या मार्गावर वारंवार अपघात झाले असून, रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पूल व मोऱ्यांची अनेक बांधकामे पूर्ण न करता नव्याने अन्य पूल बांधण्यासाठी पावसाळ्याच्या तोंडावर खुदाई केली आहे. तसेच रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात खुदाई केल्याने वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
मागील पावसाळ्यात कांडगाव ते हळदी दरम्यान कामे अपूर्ण असल्याने वारंवार रस्ता खचणे व तुटुन जाण्याचे प्रकार घडले होते. यामुळे अनेकवेळा वाहतूक बंद ठेवावी लागली होती. अपूर्ण असलेल्या कामामुळे हळदी येथील एका राहत्या घरात ओढ्याचे पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्याचे व इतर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. खुदाई केलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न होण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यात कोल्हापूर- राधानगरी रस्त्याला देवाळे-हळदी दरम्यान धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोट : मागील वर्षीच्या पावसाळ्यातील अनुभव वाईट असून, अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी माझ्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अन्य कामांसाठी खुदाई करू नये अशा सूचना दिल्या आहेत.
दीपक मिरजकर, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग
भुदरगड.
गेल्या दोन वर्षांपासून गेंड्याच्या कातड्याच्या ठेकेदाराने या रोडवर अपूर्ण कामे पूर्ण न करताच नुसतीच खुदाई केल्याने या राज्य मार्गाला धोका निर्माण झाला आहे. अपूर्ण कामामुळे पावसाळ्यात रोड बंद होतो की काय अशी अशी भीती आहे.
दिंगबर मेडसिंगे,
सामाजिक कार्यकर्ते,
कांडगाव.