शासकीय समित्यांवर लवकरच नव्या नियुक्त्या
By Admin | Updated: January 25, 2015 01:07 IST2015-01-25T01:07:07+5:302015-01-25T01:07:46+5:30
पालकमंत्र्यांची ग्वाही : वॉकिंग प्लाझा करण्याची मागणी

शासकीय समित्यांवर लवकरच नव्या नियुक्त्या
कोल्हापूर : विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांसह विविध शासकीय समित्यांवरील नियुक्त्या करण्याची प्रक्रिया येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही सहकार व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काल, शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. विविध समित्यांवर सुमारे हजारांहून अधिक सदस्यांची नियुक्ती करावी लागते, तिथे कार्यकर्त्यांना संधी देता येते म्हणून ते तातडीने केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सभेत ही मागणी केली. चंदगडला महिन्यातून दोन वेळा वाहन परवाना शिबिर घ्यावे, अशीही मागणी आमदार कुपेकर यांनी केली. सभेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी जयंती नाला ते कसबा बावडा असा सुमारे तीन किलोमीटरचा नदीकाठाने वॉकिंग प्लाझा करण्यात यावा, अशी मागणी केली. नदीपात्रापासून विशिष्ट अंतरापर्यंत बांधकाम परवाना द्यायचा नाही, असे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे त्यासंबंधी अधिक माहिती घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
सगळ्यांनाच बोलण्याची संधी दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे सदस्य अरुण इंगवले यांनी पालकमंत्र्यांचे जाहीर अभिनंदन केले. पालकमंत्र्यांचे अभिनंदन केल्यावर आमदार चंद्रदीप नरके यांनी इंगवले यांना चेष्टेने ‘आता तुमचे काम सांगा..’ असा चिमटा काढला. ‘तुम्ही जरा थांबा आता... आमचे आम्ही बघतो...’ असेही आमदार नरके यांनी इंगवले यांना सुनावले. आमदार नरके यांनी लोकप्रतिनिधींनी मागितलेला निधी व सरकारकडून प्रत्यक्षात मिळणारा निधी यांमध्ये मोठी तफावत असते; त्यामुळे आराखडा करताना नेमकेपणाने करावा. एखाद्या गावातील काम सुचविले आणि निधी नाही मंजूर झाला तर लोक नाराज होतात. त्यामुळे सुचविलेल्या कामांना निधी कसा उपलब्ध होईल असे प्रयत्न प्रशासनाने कसोशीने केले पाहिजेत, असा आग्रह धरला.
टोल, ऊसदर प्रश्नास बगल
या बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये त्यांनी समितीच्या बैठकीतील निर्णयांची जुजबी माहिती दिली; परंतु बैठकीतील निर्णयाव्यतिरिक्त अन्य कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशीही बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. सुरुवातीलाच त्यांनी टोल, मंत्रिमंडळाचा शपथविधी, ऊसदर यांविषयी आपण काहीच बोलणार नाही, असे स्पष्ट केले. टोल, ऊसदर यांविषयी या सरकारकडे आता सांगण्यासारखे ठोस काहीच नसल्याने त्यांनी या प्रश्नास सोयीस्कर बगल देणेच पसंत केले.(प्रतिनिधी)