नेताजींचे जीवन म्हणजे कर्मयोग्याची उपासना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:02+5:302021-01-23T04:24:02+5:30
........... नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आयुष्य गूढ घटनांनी भरलेलं वाटतं; पण तसं काही नाही. चित्तरंजन दास, नेताजी सुभाषचंद्र बोस, ...

नेताजींचे जीवन म्हणजे कर्मयोग्याची उपासना
...........
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आयुष्य गूढ घटनांनी भरलेलं वाटतं; पण तसं काही नाही. चित्तरंजन दास, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, अरविंद घोष, रासबिहारी बोस... अशी एकापाठोपाठ एक क्रांतिकारकांची रत्ने बंगालच्या भूमिकेमध्ये जन्माला आली. ओरिसातील कटक येथे नेताजींचा जन्म झाला. त्या ठिकाणी मी जाऊन आलो. तेथे ग्रामदेवता दुर्गादेवी आहे. कालीदेवता आहे. नेताजींचा कटक येथे जन्म झाला तरी कलकत्त्यामध्ये त्यांचे सारे आयुष्य गेले. कलकत्त्यामध्ये मी त्यांच्या घरी जाऊन आलो. ज्या कारमधून काबूलला जाण्यासाठी ते बाहेर पडले, ती हिलमन कार तिथे आजही दिसते. यानंतर मणिपूर, इंफाळला गेलो. ज्या ठिकाणी आझाद हिंद सेनेने आपला स्वातंत्र्याचा झेंडा लावलेला होता. अशा नेताजी सुभाषचंद्र यांची जडणघडण, संस्कार हे स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे होते.
अनेक वेळेला कोणताही सत्तारूढ पक्ष दोन महापुरुषांमध्ये भांडणे लावायचा प्रयत्न करतो, हे दुर्दैवी आहे. नेताजींच्या फाइल्स बाहेर काढण्याच्या घोषणा करून नेताजी आणि नेहरू यांच्यात कसे भांडण होते, नेताजी आणि महात्मा गांधींमध्ये कसे मतभेद होते, अशा गोष्टी मांडायचा प्रयत्न काहीजण करतात. नेताजी हिटलरला भेटले ही मोठी चूक होती, असे म्हणणारीही विद्वान माणसे आहेत. या विद्वानांचा तत्कालीन आंतरराष्ट्रीय जागतिक इतिहासाचा अभ्यास कमी पडतो, असे मला वाटते. वास्तविक नेताजी हिटलरला भेटले तसेच महात्मा गांधी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी फॅसिस्टवाद मानणाऱ्या मुसोलिनीलाही इटलीत भेटले होते. पंडित जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू यांचे रशियामध्ये मोठे स्वागत झाले होते. १९२७ च्या दरम्यान त्या वेळेला जगाची द्वारे मुक्त होती. या गतिमान जगामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा ध्यास श्यामाप्रसाद मुखर्जी, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांनी घेतला होता आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही तो घेतला होता. अनेक लोक हे विसरतात की, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आझाद हिंद सेनेचे सेनाधिकारी आणि सैनिकांवर ब्रिटिशांनी खटले दाखल केले, त्या वेळी तीस वर्षांपूर्वी बॅरिस्टरचा झगा उतरविलेले जवाहरलाल नेहरू यांनी पुन्हा वकिलीची कागदपत्रे घेऊन आझाद हिंद सेनेची बाजू लढविली होती. नेताजींना महात्मा गांधी यांच्याबद्दल नितांत आदर होता. त्यावेळी स्वातंत्र्याच्या दिशेने सारेच काम करीत होते. त्यामुळे एकमेकांतील मार्गभिन्नतेचे भांडवल आज स्वातंत्र्यामध्ये जन्मलेल्या पिढीने करू नये.
दुसरी गोष्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या पत्नीकडे एक पत्र दिले आणि ते पत्र आपले बंधू शिरीष बोस यांना देण्यास सांगितले होते. एक अट होती, ‘माझ्या मृत्यूनंतर ते पाकीट उघडा.’ त्या पत्रामध्ये नेताजींनी एक कळकळीची विनंती केली होती की, माझा विवाह झालेला आहे आणि मला एक मुलगी आहे. या दोघांचा सांभाळ बोस कुटुंबीयांनी करावा.
स्वातंत्र्याचा क्षण जवळ आलेला होता. आझाद हिंद सेना दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडली होती. आझाद हिंद सेनेचे सोनेरी स्वप्न भंग पावले होते. अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर सारीच परिस्थिती बदलली होती. त्याच काळात दुर्दैवाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या निधनाची बातमी आकाशवाणीने २३ ऑगस्ट १९४५ रोजी प्रसारित केली.
नेताजींचे सेनापती होते, त्यांमध्ये मेजर जनरल चतर्जी लोकनाथन, महाराष्ट्रातील मेजर जनरल जगन्नाथराव भोसले, मेजर जनरल एम. झेड. कियानी यांचा स्वतंत्र भारताने सत्कार केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन म्हणजे कर्मयोग्याची उपासना, ज्ञानयोग्याची साधना व भक्तियोग्याची निष्ठा यांचा सुंदर समन्वय होय.
..........
- डॉ. सुभाष देसाई, कोल्हापूर