दुर्लक्षित ‘चंदगड’चा विकास साधणार

By Admin | Updated: November 26, 2014 00:45 IST2014-11-25T21:46:41+5:302014-11-26T00:45:11+5:30

‘दौलत’ सुरू करण्यासाठी प्रयत्न : ‘एव्हीएच’ हटविणार, मूलभूत प्रश्न मार्गी लावणार, पर्यटन वाढीसाठी प्रयत्न

The neglected 'Chandgad' will be developed | दुर्लक्षित ‘चंदगड’चा विकास साधणार

दुर्लक्षित ‘चंदगड’चा विकास साधणार

राम मगदूम - गडहिंग्लज -चंदगड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच स्व. बाबासाहेब कुपेकरांचा एका ओळीचा जाहीरनामा होता. त्यांच्या जाहीरनाम्याची पूर्तता करण्याची जबाबदारी नियतीने माझ्यावर टाकली आहे. निसर्गसंपन्न असूनही दुर्लक्षित राहिलेल्या ‘चंदगड’चा नियोजनबद्ध विकास करणे हेच माझे ध्येय आहे. स्व. कुपेकरांचे सर्वपक्षीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे आता सत्तेत नसलो, तरी विकासात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास आमदार संध्यादेवी कुपेकरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. १५ वर्षे कुपेकरांनी गडहिंग्लज मतदारसंघाचे यशस्वी नेतृत्व केले. त्यावेळी त्यांनी जवळच्या आजरा व चंदगड तालुक्यांच्या विकासासाठीदेखील जाणीवपूर्वक प्रयत्न केले. ‘आजरा व चंदगड’च्या नळपाणी योजनांसह रेंगाळलेले चित्री व फाटकवाडी हे दोन्ही पाणी प्रकल्प पूर्ण केले. उचंगी, सर्फनाला व झांबरे या प्रकल्पांची सुरुवातही त्यांनीच केली. काही अडचणींमुळे रखडलेले हे तिन्ही प्रकल्प पूर्ण होतील.दौलत साखर कारखाना सलग चौथ्या वर्षी अजूनही बंद असल्यामुळे शेतकरी व कामगारांची मोठी कोंडी झाली आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. हलकर्णी ‘एमआयडीसी’त आलेला विनाशकारी एव्हीएच प्रकल्प स्थलांतरित करावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ‘एव्हीएच’ गेल्यानंतर हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक उद्योग-व्यवसायांना चालना देणारे रोजगाराभिमुख प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न राहतील.
हत्ती व रानगव्यांच्या उपद्रवामुळे आजरा व चंदगड तालुक्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पंचनामे होऊन भरपाई मिळवून देण्याबरोबरच जंगली प्राण्यांकडून मनुष्यहानी होऊ नये, अशी उपाययोजना वनखात्याने करावी यासाठीही प्रयत्नशील
आहे.
सामानगड, पारगड, गंधर्वगड, कलानंदीगड या ऐतिहासिक किल्ल्यांसह सरसेनापती प्रतापराव गुर्जरांचे स्मारक या पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास, संवर्धन व पर्यटनवाढीसाठी प्रयत्नशील आहे. हॉटेल व्यवसायात बाहेरगावी मजुरी करणाऱ्या स्थानिक तरुणांनी आपल्या तालुक्यात स्वत:चे हॉटेल आणि पर्यटनपूरक व्यवसाय सुरू करावा. कृषी पर्यटनालाही या ठिकाणी मोठा वाव आहे, त्यातूनही रोजगार निर्मिती होईल.
देशातील एक नंबरचा काजू चंदगडमध्ये पिकतो. गुजरात, राजस्थान या राज्यांत मोठी मागणी असणारी रताळी येथे मोठ्या प्रमाणात पिकतात. मात्र, त्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. काजू बोंडावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू व्हावा आणि काजू व भाताला हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे.
अंतर्गत रस्ते, पाणी, शाळा-इमारती, मैदाने, आरोग्य सुविधा, स्मशानशेड ही मूलभूत कामे मार्गी लावणे हे आपले कर्तव्यच आहे. त्याचबरोबर दळणवळणाची उत्तम सोय करून चंदगड मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यात कुठेही कमी पडणार नाही.

होय, हे करणार !
तीन वर्षे बंद पडलेला दौलत साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार
विनाशकारी एव्हीएच प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत हटवणार
काजू बोंड व रताळ्यावर प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्न करणार
‘काजू’ व भाताला हमीभाव मिळण्यासाठी प्रयत्न करणार
चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील पर्यटनस्थळांच्या विकासाबरोबरच पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणार.
बेरोजगारीचा प्रश्न संपविण्यासाठी रोजगाराभिमुख प्रकल्प आणि पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार
जंगली हत्तीसह हिंस्त्र श्वापदांपासून शेतकऱ्यांना संरक्षण व नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करणार.








आमदार संध्यादेवी कुपेकर
माझा अजेंडा...!

Web Title: The neglected 'Chandgad' will be developed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.