समाजाला खऱ्या ‘एनजीओं’ची गरज- संसदेत बोलायला 'दम' लागतो
By Admin | Updated: September 7, 2014 23:18 IST2014-09-07T23:02:29+5:302014-09-07T23:18:59+5:30
धनंजय महाडिक : ‘कोल्हापूर वुई केअर’ मासिकाचे अवधूत गुप्ते यांच्या हस्ते प्रकाशन

समाजाला खऱ्या ‘एनजीओं’ची गरज- संसदेत बोलायला 'दम' लागतो
कोल्हापूर : केंद्र शासनाचे अनेक समाजोपयोगी उपक्रम फक्त ‘एनजीओं’च्या माध्यमातून राबविले जातात. प्रामाणिकपणे काम करणारे अनेक ‘एनजीओ’ व संस्था आहेत. मात्र, कागदोपत्री काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. शासनाकडून मिळणारी ही मदत तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी समाजाला खऱ्या एनजीओंची गरज असल्याचे मत खासदार धनंजय महाडिक यांनी आज, रविवारी येथे व्यक्त केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून बहुआयामी सामाजिक चळवळीकडे वाटचाल करणाऱ्या ‘कोल्हापूर - वुई केअर’ या मासिकाचे प्रकाशन प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या हस्ते विवेकानंद महाविद्यालयातील डॉ. बापूजी साळुंखे सभागृहात झाले. यावेळी ते बोलत होते.
‘वुई केअर’च्या मुखपत्राचे प्रकाशन आणि ‘कोल्हापूर वुई केअर’ चळवळीचा प्रारंभ तसेच संस्थेतर्फे दत्तक घेतलेल्या जिल्ह्यातील ५०१ विद्यार्थिनींपैकी ५२ प्रतिनिधिक विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, ‘एनजीओ कम्पॅशन-२४’ संस्थेचे अध्यक्ष मिलिंद धोंड, मोहन मुल्हेरकर, सचिन शिरगावकर, सुरेंद्र जैन, अमर गांधी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.धोंड म्हणाले, @कोल्हापूर वुई केअर# ही ‘एनजीओ कम्पॅशन-२४’ या अशासकीय संस्थेची सामजिक चळवळ आहे. तिचे काम विविध क्षेत्रांत सुरू आहे. गरजूंना मदत उपलब्ध देणे, नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी कृती कार्यक्रम हाती घेणे, आदी उपक्रम राबविले जातील. या माध्यमातून जगभरातील कोल्हापूरकरांना व प्रतिभावंतांना एकत्र कोल्हापूरच्या विकासासाठी एकत्र आणण्याचा संकल्पही ‘वुई केअर’ने करावा, असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुचविले.
कलाकार सागर बगाडे हे गणपतीची विविध २१ चित्रे साकारून यातून मिळणारे उत्पन्न ‘एनजीओ कम्पॅशन २४’कडे सुपूर्द करणार आहेत. या उपक्रमाबाबत बगाडे यांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
संसदेत बोलायला 'दम' लागतो
कोल्हापूरच्या माजी खासदारांनी पाच वर्षांत संसदेत दोन वेळा तोंड उघडले. देशभरातील दिग्ग्जगांसमोर बोलण्यासाठी दम लागतो. गेल्या तीन महिन्यांत संसदेत दहा वेळा प्रश्न मांडले, असे सांगून खासदार धनंजय महाडिक यांनी तीन महिन्यांतील केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. विरोधी पक्षाचा खासदार असलो तरी आमदार चंद्रकांतदादा सोबत असल्याने घाबरण्याचे कारण नाही. त्यांना पुढे करीत सत्ताधाऱ्यांकडून समाजोपयोगी कामे करून घेता येतील, असा टोलाही महाडिक यांनी लगावला.