सामाजिक प्रवाहात सहभागी करणे गरजेचे
By Admin | Updated: August 17, 2014 22:33 IST2014-08-17T21:48:25+5:302014-08-17T22:33:42+5:30
वानरमारे समाज : भटकंती हेच त्यांच्या जिवनाचे सूत्र-वानरमारे समाजाची साडेसाती : भाग - ३

सामाजिक प्रवाहात सहभागी करणे गरजेचे
राम करले -बाजारभोगाव --प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे वानरमारे समाज विकासाच्या सामाजिक प्रवाहापासून वर्षांनुवर्षे दूर आहे. त्यामुळे ‘भटकंती’ हेच त्यांचे जीवनाचे सूत्र बनून गेले आहे. स्वातंत्र्य भारताच्या विकासाची फळे चाखण्यासाठी त्यांना सामाजिक प्रवाहात सामील करून घेणे गरजेचे आहे.
वानरमारे समाजाला जंगल परिसरात भटकंती करून आपले आयुष्य घडविण्याचा प्रयत्न करत असतो. लोकशिक्षणाचा अभाव असल्याने आपल्या परिस्थितीला पूरक रीतीरिवाज पाळले जातात. लग्नाची सोयरिक जमविताना १००० ते २००० रुपयांपर्यंत हुंडा मुलांना दिला जातो. मुलीला बाजारी सोने घालून अत्यंत साध्या पद्धतीने लग्न उरकले जाते. लग्नाची वयोमर्यादा मुलगा-मुलगी यांच्या तब्येतीवरून ठरवून वयाचा विचार न करता लग्न लावून देण्याची प्रथा आहे.
वधू-वरांना पहिल्या वर्षात अपत्य होणे शुभ मानले जाते. त्यांच्यात मुलगा अथवा मुलगी असा भेदभाव केला जात नाही. मुल जन्मले की, ओढ्यातील पाण्यात झाडाच्या पानाला बांधून जंगल परिसरातून फिरविले जाते. त्यामुळे त्याला बळकटी मिळते, अशी समजूत असते. पोंबरे येथे असलेले वानरमारे कुटुंब हे त्यांचे प्रतिनिधिक उदाहरण आहे. महाराष्ट्रातील डोंगर-दऱ्यांत अशी अनेक कुटुंबे विस्थापित झाली आहेत. त्यांना संघटित करून त्यांचा विकास साधण्याची गरज आहे. (समाप्त)