जीवनदायी योजनेची मुदत वाढविण्याची गरज--एका रेशनकार्डामुळे...

By Admin | Updated: July 30, 2014 00:30 IST2014-07-30T00:10:12+5:302014-07-30T00:30:38+5:30

जाणकारांतून प्रतिक्रिया : प्रशांतच्या मदतीसाठी आवाहन; विमा कंपनी, संबंधित रुग्णालयांची जबाबदारी टाळण्याचीच भूमिका

Need to increase the life insurance plan - due to a ration card ... | जीवनदायी योजनेची मुदत वाढविण्याची गरज--एका रेशनकार्डामुळे...

जीवनदायी योजनेची मुदत वाढविण्याची गरज--एका रेशनकार्डामुळे...

कोल्हापूर : राजीव गांधी जीवनदायी योजनेत इटीए (इमर्जन्सी टेलिफोनिक इंटिमेशन) देऊन शस्त्रक्रिया केली जाते. त्याची कागदपत्रे जमा करण्याची मुदत ७२ तास आहे; परंतु शनिवार-रविवारला जोडून सुटी येते तेव्हा एवढ्या वेळेत ही कागदपत्रे जमा करणे रुग्णाला शक्य होत नसल्याने त्याची मुदत वाढविण्याची मागणी पुढे आली आहे.
मुदतीत रेशनकार्ड जमा न करता आल्याने आंबार्डे (ता. शाहूवाडी) येथील प्रशांत पांडुरंग सोनार याच्यावर या योजनेतून उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी पै-पै गोळा करून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली; परंतु शासनाची योजना असूनही पुन्हा शस्त्रक्रियेसाठी पैसे खर्च करावे लागले. ‘लोकमत’मध्ये मंगळवारी त्या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले. आजच सकाळी प्रशांतला घरी जाऊ देण्यात आले. या बातमीची दखल म्हणून रुग्णालयाने त्याच्यावरील उपचाराचे दहा हजार रुपये माफ केले. अजूनही त्याच्यावरील नियमित उपचारासाठी पैशाची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी त्यास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या योजनेत सुरू असलेल्या सावळा गोंधळाबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विमा कंपनी व संबंधित रुग्णालये रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा ती टाळण्यातच जास्त धन्यता मानतात, असा अनुभव आल्याचे अनेकांनी सांगितले. प्रशांत सोनार याचे वडील येथील मार्केट कमिटीमध्ये हमाल आहेत. एक पोते उतरले किंवा चढवले की त्यांना सहा रुपये हमाली मिळते. त्यांची मुलांवर उपचार करण्याची ऐपत नाही. त्यामुळे प्रशांतवरील शस्त्रक्रियेसाठी बजरंग सपकाळ, गजानन पाटील, प्रा. प्रकाश पाटील, शिवपार्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक व्हनागडे व इतर शिक्षक स्टाफ, विद्यार्थी यांनी मोलाची मदत केली. मूळचे आंबार्डेचे व आता ‘गोकुळ’मध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर असलेले तानाजी कडवेकर यांनी तर स्वत:चा मुलगा रुग्णालयात असल्याप्रमाणे हा मुलगा बरा व्हावा यासाठी प्रयत्न केले. मुंबईकर ग्रामस्थांनीही खूप मदत केलीच शिवाय आणखी मदत करण्याची तयारी दर्शविली.
अ‍ॅपल सरस्वती रुग्णालयाच्या वरिष्ठ व्यवस्थापक गीता आवटे यांनी प्रशांतवर माणुसकीचा विचार करूनच रुग्णालयाने उपचार केल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘टेलिफोनिक मंजुरी घेऊन शस्त्रक्रिया केली आणि मुदतीत कागदपत्रे जमा झाली नाही, तर नंतर झालेल्या खर्चाबाबत वितंडवाद होतात. त्यामुळे शक्यतो कागदपत्रांसाठी आग्रह धरतो. या योजनेतील सर्वाधिक शस्त्रक्रिया याच रुग्णालयात झाल्या आहेत.’ (प्रतिनिधी)

पांडुरंग सोनार यांचे दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्ड आहे; परंतु ते सुस्थितीत नव्हते. त्यामुळे मुलाच्या उपचाराचा आर्थिक भार व त्यासोबतचा सगळा मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागला. आपल्या वाट्याला कधी दुर्घटना येईल, याचा नेम नसतो. याकरिता लोकांनी रेशनकार्ड काढून ठेवण्याची गरज आहे. छोटेसे दुर्लक्ष किती महागात पडते, याचाच अनुभव या घटनेतून आला आहे.

‘लोकमत’ने आज पुन्हा आरोग्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी दोन वेळा संपर्क साधला. त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यासंबंधी काय करता येते याबाबत जरूर विचार करू, असे त्यांनी सांगितले.

प्रशांतचे वडील हमाल असल्याने माथाडी बोर्डाकडून त्यांना काही मदत मिळू शकते का, याचीही चौकशी केली. सहायक कामगार आयुक्त सुहास कदम यांच्याकडे त्यासंबंधी विचारणा केल्यावर त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. पालकांना गुरुवारी कागदपत्रांसह त्यांनी भेटण्यासाठी बोलाविले आहे. माथाडी बोर्डाकडून प्रत्येकी लाखाचा विमा उतरलेला असतो. त्यातूनही मदत करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशांतचे वडील हमाल असल्याने माथाडी बोर्डाकडून त्यांना काही मदत मिळू शकते का, याचीही चौकशी केली. सहायक कामगार आयुक्त सुहास कदम यांच्याकडे त्यासंबंधी विचारणा केल्यावर त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. पालकांना गुरुवारी कागदपत्रांसह त्यांनी भेटण्यासाठी बोलाविले आहे. माथाडी बोर्डाकडून प्रत्येकी लाखाचा विमा उतरलेला असतो. त्यातूनही मदत करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Need to increase the life insurance plan - due to a ration card ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.