गोकुळ शिरगाव येथे आरोग्य उपकेंद्राची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST2020-12-15T04:39:21+5:302020-12-15T04:39:21+5:30
कणेरी : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, या गावासाठी स्वतंत्र आरोग्य केंद्राची सोय ...

गोकुळ शिरगाव येथे आरोग्य उपकेंद्राची गरज
कणेरी : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, या गावासाठी स्वतंत्र आरोग्य केंद्राची सोय नसल्याने नागरिकांना खासगी डॉक्टरकडे जावे लागते. त्यामुळे गोकुळ शिरगावसाठी आरोग्य उपकेंद्र द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. उजळाईवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात गोकुळ शिरगाव हे तीस हजार लोकसंख्या असलेले मोठे गाव आहे. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमुळे हजारो कामगार वर्ग येथे वास्तव्यास आहे. वाढत्या नागरीकरणामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कणेरी आरोग्य केंद्र व उचगाव आरोग्य केंद्र हे दूर असल्याने प्राथमिक उपचारासाठी लोकांना खासगी डॉक्टरचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी डॉक्टर भरमसाट बिल आकारत आहेत. मात्र, आरोग्य केंद्राची सुविधा नसल्याने नागरिकांना नाइलाजास्तव खासगी डॉक्टरकडे उपचार घेण्याची वेळ येते. त्यामुळे गोकुळ शिरगावचे वाढते नागरीकरण लक्षात घेता येथे आरोग्य उपकेंद्र होण्याची गरज आहे.
चौकट
मागणी करूनही जिल्हा परिषद देईना लक्ष
गोकुळ शिरगाव येथे आरोग्य उपकेंद्र व्हावे, यासाठी सरपंच महादेव पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, जिल्हा परिषद आरोग्य विभागाने याकडे कानाडोळा केल्याचे चित्र आहे.
कोट
गोकुळ शिरगाव येथे आरोग्य उपकेंद्र व्हावे यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. याबाबत जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना प्रस्ताव दिला आहे. मात्र, जाणूनबुजून वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करीत आहेत. आमदार ऋतुराज पाटील यांनी याकडे लक्ष द्यावे.
महादेव पाटील, सरपंच ,गोकुळ शिरगाव