‘एज्युकेशन इको सिस्टीम’ची गरज
By Admin | Updated: April 10, 2015 00:33 IST2015-04-09T23:52:28+5:302015-04-10T00:33:46+5:30
सिद्धार्थ मुकोपाध्याय : 'डीकेटीई'च्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरिंंग इन्स्टिट्यूटच्या 'इलेक्ट्रॉनिक्स'चा रौप्यमहोत्सव

‘एज्युकेशन इको सिस्टीम’ची गरज
इचलकरंजी : शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात ‘एज्युकेशन इको सिस्टीम’ची गरज आहे. जागतिक पातळीवर बदलत जाणाऱ्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना टिकायचे असेल, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आयआयटी खरगपूरचे प्रा. डॉ. सिद्धार्थ मुकोपाध्याय यांनी केले.
येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे होते.
‘डीकेटीई’च्या इलेक्ट्रॉनिक्स विभाग आणि आयईईई स्टुडंटस् चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पिटींग’ या विषयावरील दिवसभर सुरू असलेल्या परिसंवादात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञांचा सहभाग होता. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आयोजित या परिसंवादाची सुरुवात प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले यांच्या भाषणाने झाली. त्यांनी डीकेटीई व इलेक्ट्रॉनिक्स विभाग यांचा आढावा घेतला. उपप्राचार्या डॉ. एल. एस. आडमुठे यांनी कार्यशाळेबाबत माहिती दिली.
आवाडे यांनी सन १९८० मधील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या सुरुवातीच्या काळामधील आठवणी सांगितल्या. परिसंवादातील आपल्या प्रमुख भाषणात मुकोपाध्याय म्हणाले, केवळ ‘चॉक आणि टॉक’ ही शिक्षण पद्धती आता चालणार नाही. शिक्षणामध्ये लवचिकता आणण्याची गरज आहे. शिक्षणामध्ये पारदर्शीपणा पाहिजे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना जे हवे असेल, तर ते देण्याची आता आवश्यकता आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्सुकता असेल, त्याबाबतचे सखोल ज्ञान त्यांना मिळाले पाहिजे. आपली गुणवत्ता जागतिक स्तरावर सिद्ध करायची असेल, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणे ही आता काळाची गरज आहे. ज्यामुळे जागतिक पातळीवर सध्या नेमके काय चालू आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना होत जाईल.
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे डॉ. सी. डी. लोखंडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रबंध आणि त्यांचे संशोधन जगासमोर आले पाहिजे. त्या प्रबंधांचे चांगल्या नियतकालिकामध्ये प्रसिद्धीकरण होणे आता गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्याकडे तयार असलेल्या संशोधनाची गुणवत्ता निश्चितपणे सिद्ध होईल. यावेळी झेकोस्लेव्हियामधील संशोधक पवेल स्पेसक यांनी ‘डीकेटीई’च्या ‘अॅण्ड्रॉईड मोबाईल अॅप’ची सुरुवात केली. इलेक्ट्रॉनिक्स विभागातील व्ही. एल. एस. आय., सिग्नल प्रोसेसिंग, कम्युनिकेशन, इंटरडिस्पिलनिरी अँड
कॉॅम्प्युटिंग या विषयावरील काही प्रबंध व कोरिया देशातील विद्यार्थ्यांचे संशोधन यावेळी सादर करण्यात आले.
यावेळी मानद सचिव डॉ. सपना आवाडे, प्रा. आर. के. कामत, प्रा. ए. सी. बगली, प्रा. डी. बी. कुलकर्णी, आदी उपस्थित होते. प्रा. एस. डी. गोखले व प्रा. डी. एन. ढंग यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. प्रा. ए. व्ही. शहा यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)